जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरासह राज्यात अधिकच वाढत आहे. देशातील जनतेचं संरक्षण करण्यासाठी पोलीस, डॉक्टर दिवस-रात्र काम करत आहेत. तसेच गरिब लोकांना आणि कामगारांना याचा चांगलाच फटका बसत असल्याचे दिसत आहे. अशातच अनेक कलाकार त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. नुकताच अर्चना पूरण सिंहने गरीब लोकांना जेवण देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अर्चना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. नुकताच अर्चनाचा पती परमीत सेठीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती रस्त्याच्या शेजारी राहणाऱ्या गरिब लोकांना जेवण देताना दिसत आहे. हा व्हिडीओ नंदिनी सेनने शेअर केला आहे.
करोना व्हायरस या महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत जगात दोन लाख लोकांचा बळी गेला आहे. या रोगांमुळे २९ लाख जणांना संक्रमित केलं आहे. जगात सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील मृत्यूची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. भारतामध्येही दिवसागणिक करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात आतापर्यंत २५ हजार जणांना करोनानं ग्रासलं आहे. महाराष्ट्रात करोनाचा जास्त हाहाकार आहे.