Archana Puran Singh talks about comedy restrictions : अर्चना पूरण सिंह यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशकाहून अधिक काम केलं आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९८७ मधील ‘जलवा’ चित्रपट, त्यानंतर मुकुल आनंद दिग्दर्शित ‘अग्नीपथ’ हे त्यापैकीच एक आहेत.
अर्चना पूरण सिंह यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आमिर खानच्या ‘राजा हिंदुस्तानी’मधील नकारात्मक भूमिकेमुळेसुद्धा त्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’मधील त्यांची ‘मिस ब्रागांझा’ या भूमिकेची अजूनही क्रेझ कायम आहे.
अर्चना पूरण सिंह आता राजकुमार रावच्या ‘टोस्टर’ या चित्रपटातून झळकणार आहे. १५ एप्रिलला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अशातच आता ‘फर्स्ट स्पॉट’ला दिलेल्या मुलाखतीत अर्चना पूरण सिंह यांनी कॉमेडी, बॉक्स ऑफिस याबद्दल संवाद साधला आहे. अर्चना यांनी यावेळी हल्ली लोक खूपच संवेदनशील झाले आहेत आणि पूर्वी कधी कॉमेडीयन तुरुंगात जात नव्हते असं वक्तव्य केलं आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या याबद्दल जाणून घेऊयात…
अर्चना यांना तुम्ही आतापर्यंत अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. या जॉनरबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “आताच्या झेन जींची पद्धत वेगळी आहे. पाश्चिमात्य देशातील अनेक गोष्टींचा आपल्याकडे सहज स्वीकार केला जात आहे. पण, भारत वेगळा आहे. आपल्याकडे विविध जॉनर आहेत. सध्या पंजाबमधील कॉमेडीवर कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर यांचा दबदबा आहे. ते त्यांच्या खास पंजाबी विनोदाची झलक प्रेक्षकांसमोर आणतात.”
अर्चना पूरण सिंह यांनी व्यक्त केली नाराजी
विनोदामुळे हल्ली बरेच वाद-विवाद होत आहेत. अर्चना यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “सध्या माझी एकच तक्रार आहे की कॉमेडीवर खूप निर्बंध आहेत. लोक खूप संवेदनशील झाले आहेत. पूर्वी कॉमेडियन तुरुंगात जात नव्हते आणि आता त्यांना तुरुंगात जावं लागतंय. हा एक बदल आहे जो अजिबात चांगला नाहीये. इतर कलाकृतीप्रमाणे यातसुद्धा बदल होत आहे. सिनेमा, ओटीटी, टेलिव्हिजन सगळं बदलत आहे.”
अर्चना पूरण सिंह यांनी बॉक्स ऑफिसच्या गणितांबद्दलही सांगितलं आहे. त्यांनी यामधून त्यांच्यावेळी बॉक्स ऑफिसच्या गणितांना फार महत्त्व नव्हतं आणि आता याला खूप महत्त्व आहे आणि पूर्वी याबद्दल फार चिंता व्यक्त केली जात नव्हती पण आता जर तुमच्या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही तर तुम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं.
