Archana Puran Singh Youtube Earings : अर्चना पूरण सिंहने हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सुरुवातीला मुख्य अभिनेत्री आणि नंतर सहाय्यक भूमिकेतून तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री असण्याबरोबर अर्चना सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे ती तिचे व्लॉग शेअर करते. मात्र, नुकतंच तिने हे युट्यूब चॅनेल बंद करत असल्याचे सांगितलं. १० मार्च रोजी तिने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेवटचा असल्याचे तिने सांगितले. तिने कायमस्वरूपी नाही तर काही काळासाठी युट्यूब चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्चना पूरन सिंह, पती परमीत सेठी आणि त्यांच्या मुलांनी सुरू केलेल्या या चॅनलला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत होता. काही रिपोर्टसनुसार, या चॅनलमधून त्यांना दरमहा सुमारे ४.४ लाख ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. वर्षाला ही कमाई ५३ लाख ते ७२ लाख रुपयांच्या घरात जाते. इतकी चांगली कमाई आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळत असतानाही त्यांनी अचानक ब्रेक घेतल्याने चाहते आश्चर्य व्यक्त करत आहे.

शेवटचा व्लॉग व्हिडीओ केला शेअर

अर्चना आणि परमीत सेठी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह युट्यूबवर शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी कुटुंबीयांबरोबरचे खास क्षण शेअर केले आहेत. तसंच ते ब्रेक का घेत आहे, याबद्दलही सांगितले. अर्चनाने युट्यूब चॅनेलवरून ब्रेक घेण्यापूर्वीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये अर्चनाच्या संपूर्ण कुटुंबाने पाणीपुरीचा बेत केला होता. कुटुंबाने केलेली मजामस्ती आणि धमाल या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी म्हटले, “काही काळासाठी ब्रेक घेण्यापूर्वीचा हा आमचा शेवटचा व्लॉग आहे. असे छोटे-छोटे क्षणच आम्हाला आठवण करून देतात की, आम्ही हे चॅनल का सुरू केले.”

ब्रेक घेण्याचे नेमके कारण काय?

व्हिडीओमध्ये अर्चना आपल्या मुलांशी संवाद साधताना म्हणाली, “आम्ही वर्षभरापूर्वी हे व्लॉगिंग सुरू केले होते आणि आता आम्हाला काही काळ विश्रांतीची गरज आहे. ही काही वाईट बातमी नाही. पण आम्हाला वाटले की ही गोष्ट आमच्या यूट्यूबच्या कुटुंबाबरोबर शेअर करावी.”

हा ब्रेक कायमचा नसून केवळ काही काळासाठी असल्याचेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले. पुढे परमीत सेठी आणि त्यांच्या मुलांनी सांगितले की, जेव्हा ते परत येतील तेव्हा काहीतरी नवीन आणि अधिक मनोरंजक घेऊन येतील. अभिनेत्रीचा मुलगा आर्यमन म्हणाला, “गेल्या वर्षभरात आम्ही जे काम केले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आता पुढचे पाऊल टाकण्यासाठी हा ब्रेक आवश्यक आहे.”