हास्यसम्राट हा पुरस्कार जिंकणारे आणि प्राध्यापक दीपक देशपांडे हे नकलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. प्राध्यापक दीपक देशपांडे हे मूळचे सोलापूरचे आहेत. सोलापुरी भाषेची शैली, त्यातले विनोद, विविध प्रकारच्या भाषाशैली यावर दीपक देशपांडे यांचा अभ्यास आहे. दीपक देशपांडे यांनी सादर केलेली कॅरेक्टर्स ही त्यांनी स्वतः शोधली आहेत. दीपक देशपांडे म्हणाले नकलाकार हा प्रत्येकात लपलेला असतो, आतून काही गोष्टी कळाव्या लागतात असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच सध्या आपण हसणं विसरलो आहोत का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
नकलाकार हा खरं तर कलाकार असतो-दीपक देशपांडे
नकलाकार असतो त्यात न शब्द उगीच आला आहे. तो खरं म्हणजे कलाकार असतो. त्याचा एक टेप रेकॉर्डर त्याच्या मनात चालू असायला पाहिजे. टेपमध्ये त्याची निरीक्षणं रेकॉर्ड व्हायला पाहिजे मग त्याचा काही विषय होऊ शकतो का? हे त्याच्या डोक्यातून आलं पाहिजे हे फुलणं त्याच्या मनात होत असतं असं दीपक देशपांडे म्हणाले, तसंच त्यांनी हॅलो तरंग या रेडिओवरच्या कार्यक्रमाच्या आठवणीही सांगितल्या. अमुक-तमुक या पॉडकास्टमध्ये त्यांनी धमाल किस्से सांगितले आहेत. तसंच आपण हसणं विसरलोय का यावरही उत्तर दिलंय.
आपण हसणं विसरलो आहोत का? काय म्हणाले दीपक देशपांडे?
आपण आता हसायला विसरलो आहोत का? सतत येणारा राग, सतत तयार होणारी सामाजिक भावना या सगळ्यामुळे हसायला विसरलो आहोत का? असा प्रश्न हास्य कलाकार आणि प्राध्यापक दीपक देशपांडे यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, “मला असं वाटतं की जे काही दिसतं आहे समाज आतून डिस्टर्ब झाला आहे किंवा काहीतरी असंच घडलं आहे. पण वैयक्तिक पातळीवर जी माणसं आहेत, जी फार मोठ्या टक्केवारीतली सामान्य माणसं आहेत ती त्यांचा आनंद शोधत आहेत आणि व्यवस्थित राहात आहेत. जो काही भाग दिसतो आहे तेवढा वाईट नाही. सामान्य माणसं त्यांचा आनंद हुडकतात. एक उदाहरण देतो सोलापूरची काकडी फार गोड आहे. मी सोलापूरची शेंगा चटणी फार चांगली आहे. पण ती एखाद्या मुंबईच्या माणसाला मिळाली, तर त्याचा जो आनंद आहे तो त्याला मिळणारच आहे. आनंद माणूस शोधून काढतो. साधा, सरळ राहणारा माणूस आहे त्याच्या आयुष्यातला आनंद कमी होत नाही. तो व्यवस्थित राहतो, सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतो. मध्यमवर्गीय माणसं, विचार करणारी, समाजाला दिशा देणारी माणसं स्वतःला ढळू देत नाहीत.” असं दीपक देशपांडे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातला रसिक प्रगल्भ मनाचा आहे-दीपक देशपांडे
दीपक देशपांडे, पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात कलाकारही तसेच आहेत. महाराष्ट्रात व्यावसायिक नाटकं किती छान चालली आहेत. मराठी सिनेमाही चांगला चालला आहे. संगीतकार चांगलं संगीत देत आहेत. चांगल्या बाजू जर बघत गेल्या तर खूप छान चाललंय. एखाद्या गोष्टीतलं चांगलं घेतलं पाहिजे. चित्रकार म्हणून आम्ही काय करतो? कचरा पडलाय म्हणून ते टाळत नाही. तिथे बसतो, समोरचं चित्र काढतो, कचरा कुंडी आणि आजूबाजूचा परिसर असा चित्राचा विषय असतो. प्रत्यक्ष ते अनुभवयला ते वाईट असलं तरीही ती कलाकृती चांगली असते ना. त्यामुळे आस्वाद घेणारा, आनंद घेणारा जो रसिक आहे त्याला कायम सलामच केला पाहिजे. महाराष्ट्रातला रसिक प्रगल्भ मनाचा आहे हे नक्की.” असं उत्तर दीपक देशपांडे यांनी दिलं आहे.
