अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. त्यानंतर आता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, डिनो मोरिया, यासारख्या अभिनेत्यांची नावाचादेखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच अभिनेता अर्जुन रामपाल हा शाहरुख खानला ड्रग्ज पुरवत असल्याचं ‘दैनिक भास्कर’च्या विशेष वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींनंतर A, D,R आणि S ही नाव समोर आली आहेत. त्यानुसार, A म्हणजे अर्जुन रामपाल, D = डिनो मोरिया. R= रणबीर कपूर आणि S = शाहरुख खान हे अभिनेते आहेत. तसंच बॉलिूडमधील ड्रग्ज प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमध्ये एका ड्रग्ज पेडलरने ही माहिती दिल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांने सांगितलं आहे.
यामध्ये “अर्जुन रामपाल हा अभिनेता शाहरुख खानला ड्रग्ज सप्लाय करतो”,असं ड्रग्ज पेडलरने चौकशीदरम्यान सांगितलं आहे.त्यानुसार, सध्या एनसीबी या प्रकरणी तपास करत आहे.
रियाच्या जामीनास विरोध
सुशांत सिंह राजपूतला मृत्यूपूर्वी अंमलीपदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती हे अंमलीपदार्थांच्या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत, असा दावा करत त्यांना जामीन देण्यास अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मंगळवारी तीव्र विरोध केला.
“रिया सक्रिय सदस्य आहे. तिने सुशांतला त्याचे सेवन करण्यास उद्युक्त केले. तसेच त्याला ते उपलब्ध करून दिले, त्यासाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोपही एनसीबीतर्फे यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. आरोपींनी केलेला गुन्हा हा संघटित गुन्हेगारीच आहे. अटकेच्या भीतीने रियाने काही सांगितले नाही. तिला हा सगळा प्रकार बेकायदा असल्याचे माहित होते. त्यानंतरही ती त्यात गुंतली होती”, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.