बॉलीवूडसह एकूणच चित्रपटसृष्टीवर अंडरवर्ल्ड, डॉन, भाईगिरी यांचा वरचष्मा राहिला आहे. रामगोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाने तर अशा चित्रपटांच्या निर्मितीची फॅक्टरीच सुरू केली होती. अगदी यश चोप्रा आणि यश जोहर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अशा चित्रपटांचा मोह आवरला नाही. त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमेचा वापर करून त्याकाळी चर्चेत असलेल्या गँगस्टर्सना वेगळ्या नावाने, कथेला वेगळा मुलामा देत अनेक चित्रपट केले. अजूनही या विषयांवरचे अनेक चित्रपट हिंदी आणि मराठीतही पहायला मिळतात. या यादीत चक्क डॉन अरुण गवळीवरच्या हिंदी चित्रपटाची भर पडली आहे.
दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर उलगडणार असून या चित्रपटात अर्जुन रामपाल अरूण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. जाहिराती, माहितीपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असलेले गौरव बावदनकर हे ‘डॅडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर पेंटाग्राम फिल्म्स आणि सुनील माने एंटरटेन्मेट प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अर्जुन रामपालच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली.
अरुण गवळीसारख्या डॉनची व्यक्तिरेखा साकारणे ही फार मोठी जबाबदारी आहे. अरूण गवळींविषयी मला थोडीबहुत माहिती आहे. त्यांच्याविषयी काही वाचलेलेही आहे. मात्र, संपूर्णपणे ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांच्याकडूनच कोही गोष्टी समजावून घेणे आवश्यक आहे आणि म्हणून चित्रिकरणाआधी त्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे अर्जुनने यावेळी सांगितले. ‘डॅडी’चे चित्रीकरण ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या अर्जुन हा त्याची आणि रणबीर कपूरची भूमिका असलेल्या ‘रॉय’ चित्रपटात व्यग्र असल्याने ‘डॅडी’चे चित्रीकरण लगेच सुरू करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते.

गँगस्टर्स आणि त्यांच्यावरचे चित्रपट
दाऊद इब्राहिम हा चित्रपटकर्मीचा औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत दाऊदची व्यक्तिरेखा अनेक हिंदी चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने रंगवण्यात आली आहे. अगदी ‘डी डे’ सारख्या चित्रपटातही त्याला पाकिस्तानातून इथे आणण्याची कथाकल्पना रंगवण्यात आली. तरीही खऱ्याखुऱ्या गँगस्टर्सवर त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या चित्रपटांची संख्या मोजकी आहे. ज्यात मन्या सुर्वेवरचा ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’चा उल्लेख करावा लागेल. त्याच्याआधी माया डोळस आणि त्याच्या साथीदारांच्या ‘एन्काऊटर’ची कथा ‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’ चित्रपटातून रंगवण्यात आली होती. तर हाजी मस्तानच्या गुन्हेगारी सत्तेचा अस्त आणि दाऊद इब्राहिमचा उदय हा प्रवास दिग्दर्शक मिलन ल्युथारियाने ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात दाखवला होता.