क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने त्याची मैत्रीण सानिया चंडोकशी आज(५ मार्च रोजी) लग्नगाठ बांधली. या लग्नाला क्रिकेटविश्वातील दिग्गजांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या लग्नातील फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अर्जुन व सानियाच्या लग्नासाठी ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन जोडीने पोहोचले. बऱ्याच दिवसांनी अभिषेक व ऐश्वर्याला एकत्र पाहून त्यांचे चाहते आनंदी झाले. लग्नाला अभिषेक बच्चन काळ्या रंगाची शेरवानी घालून आला होता. तर ऐश्वर्याने हलक्या निळ्या रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस घातला होता.

अभिषेक व ऐश्वर्या एकत्र खूप छान दिसत होते. दोघांनी एकत्र पोज दिल्या. नंतर ते लग्नस्थळी गेले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

पाहा व्हिडीओ

वूम्प्ला या इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिषेक व ऐश्वर्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. खूप सुंदर जोडी, दोघेही एकत्र आहेत हे पाहून आनंद झाला, अभिषेक बच्चन खूप नशीबवान आहे की त्याला इतकी सुंदर बायको मिळाली, अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

अर्जुन-सानियाच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी

दरम्यान, अर्जुन व सानियाच्या विवाह सोहळ्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये एम.एस. धोनी व त्याची पत्नी साक्षी, युवराज सिंह, हरभजन सिंह, झहीर खान, सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांचा समावेश होता. तसेच अंबानी परिवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रफुल्ल पटेल, आशिष शेलार व सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक राजकीय नेतेही नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.

सानिया चंडोक कोण आहे?

सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘ग्रॅव्हिस ग्रुप’चे अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. तिचे कुटुंब बास्किन रॉबिन्ससारख्या मोठ्या ब्रँड्सशी संबंधित आहे. सानियाने ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून शिक्षण पूर्ण केले आहे. ती स्वतः एक उद्योजिका असून मुंबईत ‘Mr. Paws’ नावाचे लक्झरी पेट स्पा आणि वेलनेस सेंटर चालवते. सानिया आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर या खूप जुन्या आणि जवळच्या मैत्रिणी आहेत.