|| निलेश अडसूळ

एखाद्या कलाकृतीत असलेला भूमिकेचा कालावधी लक्षात घेण्यापेक्षा त्या भूमिकेचे महत्त्व आणि वेगळेपण लक्षात घेऊन त्याला न्याय देणारी एक अभिनेत्री आज मराठी मनावर राज्य करते आहे. ती कधी मुंबईचा रेटा धरलेली प्रेयसी झाली, कधी यल्लम्माला सोडलेली सुलू, कधी चंपा, तर कधी अम्मी. अगदी ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रित करायला आलेली ‘उर्वी’ चित्रपटाच्या मूळ कथेच्या सभोवताली असली तरी तिच्या तरलतलम भावनेने आणि वावराने चित्रपटाला अधिकच सक्षम करून गेली. आता इतकी उदाहरणे समोर आल्यानंतर तिच्या नावाचे गुपित काही उरलेच नाही. मनोरंजन क्षेत्रातील विविध प्रकार लीलया पेलणारी ‘ती’ म्हणजेच नावाप्रमाणेच विचाराने आणि कृतीने मुक्त असणारी मुक्ता बर्वे. प्रेक्षकांच्या मनात तिने प्रवेश केलाच आहे, पण लवकरच ती आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करणार आहे. ‘अजूनही बरसात आहे..’ या सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने मुक्ता बर्वे आणि उमेश कामत एक प्रेमकथा घेऊन येत आहेत. त्यानिमित्ताने मुक्ताशी साधलेला हा संवाद..

‘‘गेल्या काही वर्षांत नाटक आणि चित्रपट सातत्याने सुरू असल्याने मालिकेकडे वळता आले नाही. मालिका करणे ही मोठी जबाबदारी असते. वेळेशी आपण बांधील असतो. त्यामुळे इथे यायचे म्हणजे पुरेसा वेळ हवा. आता तो आहे, पण वेळ असूनही चालत नाही, उत्तम संहिताही हवी. मधल्या काळात बऱ्याच कथा वाचल्या जात होत्या, पण या कथेमध्ये मला हवे असलेले वेगळेपण गवसले. विशेष म्हणजे नाटक आणि चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करतात, पण मालिका मात्र मनासोबत घराघरांत पोहोचतात. ती मालिका संपेपर्यंत ते पात्रच तुमची ओळख झालेले असते. लोक आपल्यावर प्रेम करतात, सल्ले देतात, भूमिकेतले काही आवडले नाही तर त्याच मायेने रागावतातही. आपण त्यांच्या रोजच्या आयुष्यातला भाग होतो,’’ असे मुक्ता मालिकाविश्वातील पुनरागमनाविषयी बोलताना म्हणाली.

‘‘जवळपास चार ते पाच वर्षांनी मी मालिकाविश्वात येते आहे. त्यातही रोमँटिक कथा असलेली मालिका करून दहाएक वर्ष झाली असतील. ही कथा खूप वेगळी आहे. पस्तिशी ओलांडलेल्या तरुणांच्या प्रेमावर, लग्नावर ती भाष्य करते. विशेष म्हणजे ती घराघरांतली कहाणी आहे. आज वयाच्या पस्तिशीत आलेले दोघे लग्नासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रोमोमधून दिसत असले तरी त्यांच्या आयुष्यात आधी काय घडले होते, तेव्हा ते कसे होते याचाही गमतीशीर भाग हळूहळू उलगडत जाईल,’’ असे बोलून तिने मालिकेविषयी अधिकच उत्कंठा वाढवली. रोहिणी निनावे, मुग्धा गोडबोले यांचे लेखन, केदार वैद्य यांचे दिग्दर्शन, आयरिससारखी निर्मिती संस्था आणि सोनी वाहिनी भक्कमपणे सोबत असल्याने काम करताना मजा येते आहे. बऱ्याच वर्षांनी मी माझा मित्र, लाडका अभिनेता म्हणजे उमेशसोबत काम करत असल्याने अधिकच आनंद असल्याचे तिने सांगितले.

मालिकेच्या निमित्ताने मुक्ता आणि उमेश एकत्र आले असले तरी त्यांची पडद्यामागेही तितकीच गट्टी आहे. ‘‘या क्षेत्राची सुरुवात केली तेव्हा मी आणि उमेशने एका हिंदी एकांकिकेत एकत्र काम केले होते. तेव्हा मीही नवीनच होते आणि तोही नुकताच वाहिनीविश्वात आला होता. पुढे ‘आभाळमाया’च्या दुसऱ्या पर्वात आम्ही काही वेळ एकत्र होतो. या क्षेत्रात उभे राहताना आम्ही एकमेकांना जवळून पाहिले आहे. ‘लग्न पहावे करून’ हा चित्रपट आम्ही दोघांनी केला. त्यामुळे आमची मैत्री ही फार जुनी आहे. उलट बरेच दिवस आम्ही एकत्र काम केले नसल्याने काही तरी करू या, नाटक किंवा चित्रपट करू या असा विचार आमचा सुरू होता; पण अचानक ही मालिका समोर आली आणि आमची इच्छा पूर्ण झाली. त्याचे व्यक्तिमत्त्व अगदी उत्फुल्ल असल्याने सोबत काम करताना मजा येते,’’ अशा शब्दांत मैत्रीच्या आठवणींनाही तिने उजाळा दिला.

नाटक आणि मुक्ता हे अविभाज्य समीकरण आहे; पण सध्या नाटक ठप्प असल्याने लवकरच ते सुरू होईल, अशी अशा मुक्ताने व्यक्त केली. सोबतच प्रेक्षकांच्या आरोग्याला महत्त्व द्यायला हवे, असेही तिने नमूद केले. ‘‘नाटक ही प्रत्यक्ष सादर केली जाणारी कला असल्याने तिथल्या मर्यादा, तिथले प्रश्न वेगळे आहेत. अजून करोनाचा धोका टळलेला नसल्याने लोकांचे घराबाहेर पडणे जिकिरीचे आहे. किंबहुना नाटकाला येणारा प्रेक्षक वर्ग हा चाळीसच्या पुढचा असल्याने प्रेक्षकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही तरी उपाय किंवा तोडगा काढून नाटक सुरू करणे हा पर्याय नाही. अर्थात उद्या सरकारने जाहीररीत्या या संकटाची तीव्रता कमी झाल्याचे सांगितले आणि नाटय़गृहांची दारे खुली केली तर नक्कीच नाटक पुन्हा सुरू होईल,’’ असे विचार तिने मांडले.

ती स्वत: नाटय़निर्मातीही आहे. बऱ्याचदा नाटकांचे मर्यादित प्रयोग केले जातात. त्याच्या कारणांची चर्चा करताना ती म्हणाली, ‘‘प्रत्येक नाटकाचा वेगळा बाज असतो. त्यानुसार त्याच्या प्रयोगमर्यादा ठरतात. ‘सखाराम बाईंडर’ केले तेव्हा त्याचा उद्देश स्पष्ट होता की, आलेला निधी रंगमंच कामगारांना देणे. जवळपास नऊ लाखांहून अधिक निधी जमा करून आम्ही तो सुपूर्द केला; पण जेव्हा ‘कोडमंत्र’सारखे नाटक करतो तेव्हा अर्थकारणाचाही विचार करावा लागतो. जवळपास एक बस, एक ट्रक, चार-पाच खासगी गाडय़ा, ५० हून अधिक कलाकार इतके मोठे वऱ्हाड घेऊन आम्ही २५० हून अधिक प्रयोग केले. ते खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. ते पेलण्यालाही मर्यादा असल्याने थांबण्याचा निर्णय घेण्यात आला.’’

‘‘अग्निशिखा’ या मालिकेतून कथानायिका म्हणून मी पहिल्यांदा छोटय़ा पडद्यावर आले. ती संधी मला आयरिसच्या विद्याधर पाठारे यांनी दिली होती. आजही मी त्यांच्यासोबत काम करत असल्याने चित्रीकरण करताना घरच्यासारखे वातावरण असते. या मालिकेविषयी आवर्जून सांगावेसे वाटते ते म्हणजे, प्रोमो आल्यानंतर लोकांचा प्रतिसाद पाहून मी थक्क झाले. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे निदर्शनास आले. असे जेव्हा घडते तेव्हा आमचा आत्मविश्वास वाढतो. प्रेक्षकांचे प्रेम पाहून समाधान मिळते आणि म्हणून मी त्यांचे आभार मानते.’’ अशी कृतज्ञता व्यक्त करत मुक्ताने या मुक्तसंवादाला पूर्णविराम दिला.

वेबविश्व नक्कीच वेगळे आहे, कारण तिथे कलाकारांना वेगळ्या स्वरूपाचे काम  करता येते आहे. मालिका, चित्रपट यांचा मध्य साधणारे आणि वेगळ्या परिमाणांचे हे माध्यम प्रेक्षकांपर्यंत सक्षमतेने पोहोचते आहे. विविध विषय हाताळले जात आहेत. अजून मी या माध्यमात काम केलेले नाही; पण चांगली संधी आली तर नक्कीच स्वीकारेन. भविष्यात चित्रपटाच्या माध्यमातून ‘चरित्रपट’ करायला आवडेल. -मुक्ता बर्वे