scorecardresearch

आनंदी-गोपाळ एका स्वप्नपूर्तीची गोष्ट!

हा प्रवास फक्त त्यांच्या या यशाचा नाही, तर त्यांच्यातील नातेसंबंधांचाही आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी इंग्रजी शिक्षणाचा नुकताच प्रचार होऊ  लागला होता, परंतु स्त्री-शिक्षण, परदेशगमन या गोष्टींचा विचारही झाला नव्हता. अशा काळात गोपाळ विनायक जोशी या पोस्टमास्तराची अठरा वर्षांची पत्नी आनंदी इंग्रजी भाषा शिकते. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला जाते. नेटाने तो अभ्यासक्रम पूर्ण करते. ही अपूर्व घटना होती. या हुशार, कर्तृत्ववान स्त्रीचे चरित्र आपण आजवर पुस्तकांतून, काही लेखांतून वाचले आहे. तत्कालीन समाज, आचार-विचार, रूढी-समज, चालीरीती यांनी वारंवार त्यांच्या कार्यात अडथळा आणला. पण ते मागे हटले नाहीत. आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी या दोन व्यक्तिमत्त्वांचे चरित्र त्यांच्या गुणदोषांसकट रेखाटायचे आहे. सत्याचा अपलाप आणि काल्पनिक घटनांचा समावेश करण्याचा मोह टाळून चरित्रपट करणे ही जबाबदारी त्या त्या चित्रकर्त्यांची असते. या सगळ्याचे भान ठेवूनच ‘आनंदी गोपाळ’ची कथा पडद्यावर साकारली. त्याविषयी सांगताहेत चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस, पटकथालेखक इरावती कर्णिक, गोपाळराव म्हणजेच ललित प्रभाकर, आनंदीबाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आणि झी स्टुडिओचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी.

‘यश, नातेसंबंध आणि वैचारिक संघर्ष’

या चित्रपटाची पटकथा वाचली तेव्हा पहिला प्रश्न हाच विचारला की आज ही कथा सांगण्यामागे काय संदर्भ आहे? जेव्हा चित्रपटगृहात जाऊ न आनंदीबाईंची गोष्ट पाहेन तेव्हा मला त्यातून काय मिळणार आहे? स्त्रियांची परिस्थिती तेव्हा आणि आजही फार बदललेली नाही. आजही शनिशिंगणापूर, शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. त्यांना विरोध करणारे पुरुषच नाही तर स्वत: स्त्रियाही विरोध करणाऱ्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर १३२ वर्षांपूर्वीचा म्हणजे १८७५ ते १८८७ असा काळ चित्रपटातून उलगडणार आहे. ज्या काळात नुसतं शिक्षण घ्यायचं नाही तर आनंदीला डॉक्टर व्हायचं आहे. त्या वेळी समाजाच्या दृष्टीने वैद्य सर्वोत्तम, डॉक्टरकडे जाणं हे पाप मानलं जायचं. अशा काळात आनंदीबाईंच्या मनात शिक्षणाबद्दलची ऊर्मी, ते मिळवण्यासाठीची ऊर्जा आली कुठून? नुसता विचार करून हे दोघे पती-पत्नी थांबले नाहीत तर त्यांनी निर्णय घेऊन संघर्षांला तोंडही दिले. इथे शिक्षण मिळत नाही तर परदेशात शिक्षण घेऊ. अमेरिकेला जाऊ. आजही परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाताना आपण विचार करतो, त्यांनी तर समोर कठोर आव्हानं असूनही ते साध्य केलं.

हा प्रवास फक्त त्यांच्या या यशाचा नाही, तर त्यांच्यातील नातेसंबंधांचाही आहे. ज्या काळात बाई नवऱ्याच्या पाच पावलं मागून चालायची. त्याच्या मागे खुर्ची सरकवून बसणार, किंवा खालीच बसणार, वरती बघणार नाही, नवऱ्याचं नाव घेणार नाही, अशी बंधनं होती. त्या वातावरणात ते दोघंही मित्र असल्यासारखे प्रवास करत होते. त्यांच्यातील नातेसंबंधसुद्धा रंजक आहेत. त्यांच्यासारखं नातं आताही सहजी बघायला मिळत नाही. त्या दोघांच्या नात्यामध्ये ध्येयाने संघर्षांने भारलेले प्रसंग तर आहेत, त्यासोबत मजेशीर प्रसंगही आहेत. ही सरळ सोपी कहाणी नाहीय. त्यांच्या खूप आत काहीतरी घडलंय. त्यामुळे काळाच्या चौकटीपलकडच्या या गोष्टी चित्रपटातून मांडता येतील आणि प्रेक्षक सहजपणे ते आजच्या काळाशी जोडून घेऊ शकतील, असं मला वाटतं.

या चित्रपटात गोपाळराव आणि आनंदी या दोन्ही व्यक्तिरेखांची मांडणी करणं हेही एक आव्हान होतं. या दोघांच्या वयातही खूप अंतर होतं. गोपाळरावांविषयी खूप लिहिलं गेलं आहे. त्यांचा तऱ्हेवाईक स्वभाव, त्यांच्याशी बोलतानाही भीती वाटायची. पण आनंदीबाई स्वभावाने कशा होत्या, हे फार लिहिलेलं सापडत नाही. अशा वेळी व्यक्तिरेखांची मांडणी करणं अवघड होतं, कारण चित्रपटात जे दाखवलं जातं ते प्रेक्षक खरं मानतात. त्यामुळे त्या दोघांचंही चुकीचं चित्रण लोकांसमोर जाऊ नये, याची आम्ही काळजी घेतली.

त्यासाठी तीन र्वष पटकथेवर संशोधन करत होतो. त्यामुळे चित्रीकरण करताना कुठलीही संदिग्धता मनात नव्हती, पण गोष्ट मांडण्याचं स्वातंत्र्य घेताना काळजी घेणं आवश्यकच असतं. दृश्य माध्यमातून एका माणसाची कथा सांगताना, त्या कथेचा परिणाम चित्रपट स्वरूपात मांडताना त्याची इतर अंग जपलीच पाहिजेत. तरच ती कथा प्रेक्षकांसमोर मनोरंजनात्मक पद्धतीने मांडता येते. नाहीतर माहितीपट हा सोपा पर्याय आहेच. माहितीपट आणि चित्रपट यांच्यामध्ये जी बारीक रेषा आहे ती जपली पाहिजे. स्वातंत्र्य घ्यायला काहीच हरकत नाही. पण स्वातंत्र्य घेताना त्यातील तथ्य, तर्क बाजूला सारता कामा नयेत. कथेच्या मनोरंजनात्मक मांडणीसाठी काल्पनिक जोड गरजेची आहे, पण मला वाटलं म्हणून मी त्यातलं तथ्यच बदललं तर ते चूक ठरेल. मग त्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असं म्हणणंही योग्य नाही.

त्या काळात आनंदी-गोपाळ कसे घडले असतील याचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्या वेळी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली होती. १८७० मध्ये त्या शाळेतील वर्गात मुलींची संख्या जास्त होती, अशी नोंदही सापडते. पण उच्चवर्णीयांमध्ये त्या काळात मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन नव्हते. गोपाळराव टपाल कार्यालयात काम करायचे. त्यामुळे त्यांचे इंग्रजांशी जवळचे संबंध आले. इंग्रजांकडे ज्ञानाचे भांडार आहे, ते शिकून घेतलं पाहिजे हे लक्षात आल्याने गोपाळराव त्यांच्याकडे ओढले गेले होते. त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीलाही शिकवायचा प्रयत्न केला होता, पण त्या फार जगल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांदा लग्न करताना त्यांनी अटच अशी घातली होती की ते त्या मुलीला शिकवणार. दुसरीकडे आनंदीच्या वडिलांनीही तिला थोडंफार शिकवलं होतं. त्यामुळे आनंदीबाईंच्या आयुष्यात वडील आणि नवरा दोघांच्या प्रयत्नांमुळे शिक्षणाचा पाया भक्कम झाला होता. पण ते बाहेर समाजात नव्हतं. गोपाळरावांविषयी पुढे वाचलं की कळतं त्यांना भारतातच राहायचं नव्हतं. हा भयंकर समाज आहे. मला परदेशी जायचं आहे. म्हणून ते खूप फिरले. त्याबाबतीत त्यांचं वागणं चत्मकारिक होतं. ते कोणापासून प्रभावित झाले होते, याची कुठे नोंद नव्हती. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं, स्त्रियांना त्यांच्या कोषातून बाहेर काढायचं असेल तर ते शिक्षणामुळेच साध्य होऊ  शकतं. त्या वेळी दुसरीकडे आगरकर, रानडे, टिळक आणि पंडिता रमाबाई असा सुधारकांचा काळही सुरू झाला होता. त्याचाही प्रभाव असावा. पण एकूणच तो पारंपरिक आणि पुरोगामी विचारांच्या घर्षणाचा काळ होता. कुठलाही बदल घडवायचा असेल तर अत्यंत परखड व्हावं लागतं. त्यामुळे गोपाळरावांचं परखड असणं हे एकाअर्थी त्या काळाला, त्या परिस्थितीला साजेसं होतं.

आनंदीच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे आणि तिच्या आजूबाजूची माणसं दाखवताना पहिली ९ ते २२ र्वष हा काळ खूप महत्त्वाचा होता. याच काळात तिचं लग्न झालं होतं. आनंदी शिकू लागली, ती इंग्रजी शिकली, तिथून ती बंगालच्या महाविद्यालयात गेली, मग अमेरिकेला गेली, डॉक्टर झाली, भारतात परत आली, हे सगळं तिने १२ वर्षांत केलं,  हे अविश्वसनीय आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील हा बारा वर्षांचा काळ सगळ्यात महत्त्वाचा होता. त्या दोघांनी शिक्षणाच्या मागे खूप प्रवास केला. अक्षरश: ते स्वप्नांच्या मागे धावले. त्यातला भावनिक बंध अधिक प्रभावीपणे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आता प्रेक्षकांच्या दिग्दर्शकांकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. चित्रपट जेवढा वास्तवाशी जवळ जाणारा असेल तेवढा तो त्यांना भावतो. आजच्या पिढीला त्यांचं जग चित्रपटात पाहायला आवडतं. त्यामुळे निर्मातेही तरुणाईचा विचार करू लागले आहेत.

– समीर विद्वांस, दिग्दर्शक

‘माणूसपण उलगडणे महत्त्वाचे’

काळ कोणताही असो. जेव्हा प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही करायचं असतं तेव्हा समाजाकडून विरोध हा होतोच. आताही आपण काहीतरी वेगळं करावं असा विचार केला तर समाजमाध्यमांतून नकारात्मक टीकाटिप्पणी होते, राग व्यक्त होतो. आपल्यालाही मग त्रास होऊ लागतो की आपल्या वेगळं काही करण्याच्या प्रयत्नांना कोणी समजून घेत नाही. १८ व्या शतकातही तेच घडत होतं. काहीतरी वेगळं करू पाहणारी माणसं ही नेहमी मूठभरच असतात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही दीडशे वर्षांपूर्वी गोपाळराव आणि आनंदीबाईंना पुरोगामी पाऊल टाकणं शक्य होतं, तर आज आपल्याला त्या तुलनेत कितीतरी सोयी उपलब्ध आहेत. फक्त करण्याची इच्छाशक्ती हवी, ती प्रेरणा या चित्रपटातून मिळावी, असा उद्देश होता.

स्वप्न पाहणं आणि ते तडीस नेणं यातलं जे अंतर आहे, ते पार करण्याची जिद्द, ताकद हा चित्रपट देईल अशी आम्हाला आशा आहे. स्वप्न आपण काळाप्रमाणे पाहात नाही. कुठल्याही काळात आपण असलो तरी प्रत्येकजण काही ना काही स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडतो. त्या सगळ्यांनाच या चित्रपटामुळे बळ मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपल्याकडे शिक्षण म्हणजे चांगल्या गुणांनी परीक्षा पास होणं एवढाच मर्यादित अर्थ आजही आहे, मात्र शिक्षणाने विचार बदलतात. जगण्याची पद्धत बदलता येऊ शकते, या दृष्टीनेही शिक्षणाबद्दल निदान संभाषण सुरू व्हायला हवं.

माणूस कर्तृत्वाने मोठा झाल्यानंतर त्याच्यावर पुस्तक लिहावंसं वाटतं, चरित्रपट काढावासा वाटतो, त्याबद्दल सांगावंसं वाटतं. हा प्रवास रंगवताना त्या माणसाच्या मोठेपणापेक्षा तो थोर कसा बनत गेला, त्याचं माणूसपण उलगडणं जास्त महत्त्वाचं असणार होतं. कारण थोर माणूस कोणीतरी वेगळ्या बेटावर जन्मलेला, आपल्याशी काही संबंध नसलेला असा नसतो. तोही आपल्यासारखाच सर्वसामान्य असतो. परिस्थिती, निश्चय, चिकाटी या सगळ्याचा योग्य मेळ साधला गेला की ते घडून येतं, हे कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. गोपाळराव आणि आनंदीबाई ही दोघंसुद्धा तुमच्या-आमच्यासारखी हाडामासाचीच माणसं आहेत. तीसुद्धा आपल्यासारखी चुकतात, धडपडतात आणि तरी त्यातून त्यांच्या ध्येयाप्रती मार्ग काढत जातात. हे या गोष्टीतून दाखवायचं होतं. त्यामुळे त्यांचं माणूसपण जास्तीतजास्त कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

आनंदीबाईंना डॉक्टर झाल्यानंतरही समाजमान्यता मिळाली नव्हती. कोल्हापूरच्या राणींनी संस्थानातील रुग्णालयात मुख्य डॉक्टर म्हणून त्यांची नेमणूक केली आणि त्यानंतर त्यांना समाजमान्यता मिळाली. त्यामुळे काळाच्या पुढचा विचार करताना तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर ते शक्य होतं. आजही काही स्त्रिया वेगळं काहीतरी करू पाहतात, वेगळं जगू पाहतात, त्यांना अनेकदा नावं ठेवली जातात. त्यांच्याबाबतीत आक्रस्ताळेपणा केला जातो. स्त्रीवादी आहे असं म्हटलं जातं. अशा वेळी त्यांना नाही दूरदृष्टी असं म्हणून पुढे जाता यायला हवं. चित्रपटातील संवादासाठी भाषाशैली ठरवताना अंजली किर्तने, काशिबाई कानिटकर, श्री. ज. जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून त्या काळाचा, भाषेचा अंदाज घेतला. त्यानुसार बोजड वाटणार नाही, असा मध्यम मार्ग काढून भाषाशैली निवडली. संवादातून ती माणसं प्रचारकी वाटता कामा नयेत तर जवळची, खरी, विश्वास बसेल अशी वाटावीत हा त्यामागचा विचार होता.

इरावती कर्णिक, लेखिका‘गोपाळरावांसारखी भूमिका मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते’

गोपाळरावांच्या भूमिकेची विचारणा झाली तेव्हा अर्थातच मी हो म्हणालो, कारण भूमिका वेगळी होती, काळ वेगळा होता.  गोपाळरावांविषयी फार माहिती नव्हती. मग अंजली किर्तने यांचं ‘आनंदीबाई जोशी काळ आणि कर्त्वृत्व’ नावाचं पुस्तक वाचलं. ते वाचलं तेव्हा कळलं की ही खूप प्रभावी व्यक्तिरेखा आहे. ते रागीट होते, विक्षिप्त होते, या गोष्टी वरवरच्या होत्या. पण त्यांची मन:स्थिती काय असेल त्या वेळेस? एखादी व्यक्ती एवढी पुरोगामी विचारांची आहे, जी आपल्या बायकोला स्वत:पेक्षा जास्त शिकवते. हे आजच्या काळातही किती पुरुष सहन करू शकतील किंवा तसं पाऊल उचलू शकतील? स्वत:पेक्षा जास्त शिकवणं, तिच्यावर स्वत:पेक्षा जास्त विश्वास ठेवणं, अमेरिकेला पाठवणं.. काय विचार असेल त्या माणसाचा आणि हे सगळं त्यांनी निस्वार्थीपणे केलं होतं. अभिनेता म्हणून ते मांडणं ही माझी जबाबदारी होती.

गोपाळरावांची व्यक्तिरेखा आणखी नीट समजून घेण्यासाठी मी त्यांची पत्रं वाचली, ती खूप फायद्याची ठरली. त्या पत्रांमधील मजकूर खाजगी होता, आणि खूप खरा होता. काही पत्रं अशी नाटय़ात्मक होती की ते एक पत्र म्हणजे नाटक किंवा चित्रपट वाटावा. आनंदीबाईंना अमेरिकेत पाठवल्यावरचं त्यांचं पहिलं पत्र होतं, त्यात त्या दूर गेल्याचा त्यांना किती त्रास झाला, ते त्यांच्याशी किती कठोर वागले होते, अशी वर्णनं होती. त्यात त्यांनी आपल्याला वाईट वाटत होतं मात्र कठोर वागण्याशिवाय पर्याय नव्हता, हेही नमूद केलं होतं. या सगळ्यातून त्यांची स्वभाववैशिष्टय़े समजण्यासाठी मदत झाली.

गोपाळरावांची व्यक्तिरेखा साकारताना त्यांचा २८ ते ४० वर्षांचा काळ दाखवायचा होता. त्यामुळे वयातले बदल फार नव्हते. अशा वेळी दर दोन-तीन वर्षांनी काय बदल होईल हे दाखवायचं होतं. ते आव्हानात्मक वाटलं. आम्ही गीतांजली कुलकर्णीबरोबर एक कार्यशाळा केली होती. त्या काळातील माणसं कशी वावरत असतील या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला. चित्रपटासाठी वेगळी भाषा ठरवली, कारण त्या काळातली भाषा फारच बोजड वाटू शकली असती. जेव्हा एक माणूस समाजाच्या विरोधात जाऊ न संघर्ष करतोय, खरंतर समाज त्याला मदत करत नाहीये, तर तो लोकांना कसं प्रत्युत्तर करत असेल, हे समजण्यासाठी अर्थातच पटकथेची खूप मदत झाली.

कलाकार म्हणून आपल्याला जे योग्य वाटतं तेच करणं सध्या तरी अवघड आहे. कारण मी ठरवलं आणि मला तशी भूमिका मिळाली असं होत नाही. त्यासाठी वाट बघावी लागते, तशा प्रकारची भूमिका येईपर्यंत थांबणं, तोपर्यंत काम येतंय म्हणून ते करण्याचा मोह टाळणं हे करावं लागतं. अभिनेता म्हणून प्रगत करणाऱ्या भूमिका करण्यावर माझा भर असतो. भूमिकेसाठी धोका पत्करणं आवडतं. स्वत:लाच आश्चर्यचकित करू शकेन अशा भूमिका मला करायच्या आहेत. त्यामुळे माध्यमांच्या मर्यादाही स्वत:वर घालायला हव्यात, असं वाटतं. त्या त्या माध्यमात काम करताना तेवढा वेळ त्यासाठी देणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे एका वेळी एका माध्यमात काम करणं हेच योग्य आहे.

– ललित प्रभाकर, अभिनेता

‘आनंदीबाई साहित्यातून उमजत गेल्या’

आनंदीबाईंची काही छायाचित्रं होती. त्यांनी लिहिलेल्या पत्रांतून त्या कशा आहेत, त्यांना काय वाटत असेल हे कळत होतं. त्यातून त्यांचे विचार कळत होते. कॅरलिन डॉल या पहिल्यांदा आनंदीबाईंना भेटल्या. काशिबाई कानिटकर यांनी त्यांच्यावर पहिलं पुस्तक लिहिलं. या दोघींनी जे आनंदीबाईंबद्दल म्हटलंय किंवा गोपाळरावांकडून त्या दोघींना आनंदीबाईंविषयी जे कळलंय, या माहितीचा सुवर्णमध्य साधण्यासाठी मला अंजली किर्तने यांच्या पुस्तकाची मदत झाली. पुस्तकांतील वर्णनांमधून आणि गीतांजली यांच्या कार्यशाळेमुळे व्यक्तिरेखा साकारायला मदत झाली. शिवाय, दिग्दर्शक म्हणून समीरनेही खूप सहकार्य केलं.

– भाग्यश्री मिलिंद, अभिनेत्री

काळाच्या पुढे जाणारा विचार मांडण्याचा प्रयत्न

आजच्या काळाचा विचार करताना मागील काळात ज्यांनी उत्तुंग कार्य करून ठेवलंय, त्यांच्यामुळे आपण आज आहोत. कारण त्यांनी काळाच्या पुढचा विचार केला होता. त्या काळात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या गोष्टी आनंदीबाईंनी गोपाळरावांच्या साथीने शक्य करून दाखवल्या. काळाच्या पुढे चालणारी माणसं महाराष्ट्रात होऊ न गेली, तेव्हा त्यांनी काय विचार केले होते, आज ते विचार लोकांसमोर मांडण्याची गरज वाटत होती, म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली. स्त्रीला योग्य वागणूक गोपाळराव त्यांच्या वर्तनातून कसे देत होते, हे जरी नुसतं प्रेक्षकांनी पाहिलं तरी मुलाने कसं वागावं आणि मुलीने कसं वागावं हे सहज कळेल. एकमेकांची आवड जपत एकमेकांना सावरणारे हे दोघे पाहिल्यावर प्रेक्षकांनाही ते आपलेसे वाटतील. काळाचा विसर पडावा अशा गोष्टी, घटना यात आहेत. आम्ही ऐतिहासिक किंवा चरित्रात्मक चित्रपट केलेला नाही तर त्यांचा काळाच्या पुढे जाणारा विचार लोकांपर्यंत पोहोचवणारा हा चित्रपट आहे.

– मंगेश कुलकर्णी, व्यवसायप्रमुख – झी स्टुडिओ

शब्दांकन – भक्ती परब, छाया – प्रदीप दास

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about anandi gopal marathi movie