‘सवेरेवाली गाडी’ झगमगाटी विश्वाची अंधारी बाजू

गेल्या तीसेक वर्षांत भारतात इलेक्ट्रॉनिक मीडियाचं- त्यातही मनोरंजन वाहिन्यांचं अमाप पीक आलं आहे.

|| रवींद्र पाथरे

गेल्या तीसेक वर्षांत भारतात इलेक्ट्रॉनिक मीडियाचं- त्यातही मनोरंजन वाहिन्यांचं अमाप पीक आलं आहे. टीव्ही इंडस्ट्रीच्या या ‘बूम’मुळे एक जगड्व्याळ विश्व आकारास आलं आहे. या विश्वाचे काही उसूल आहेत. कायदेकानू आहेत. या कोरडय़ा, जीवघेण्या स्पर्धात्मक जगाचं नातं केवळ यशाशीच असतं. ते ज्यांना वश होत नाही त्यांना हे विश्व ओळखही दाखवीत नाही. वरकरणी झगमगाटी, वलयांकित भासणाऱ्या, परंतु माणसाचं सर्व प्रकारे शोषण करणाऱ्या या दुनियेत पाऊल टाकणं आणि त्यात तगून राहत आपली ओळख निर्माण करण्याचं आव्हान पेलताना माणसाची जी भीषण फरफट, कोंडी अन् उलघाल होते, ती सहन करणं हे येरागबाळ्याचं नक्कीच काम नाही. या क्षेत्रातली जीवघेणी स्पर्धा, भावनारहित मानवी संबंध, यशासाठी ‘वाट्टेल ते’ करण्याची इथल्या माणसांची तयारी पाहता भावनाशील व्यक्ती इथं टिकणं अशक्यच. अभिराम भडकमकर यांच्या ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ या कादंबरीत या दुनियेचं जे चित्रण केलं गेलं आहे ते सर्वार्थानं खरं आहे. इथे काम मिळवण्यापासून ते प्रत्यक्ष छोटय़ा पडद्यावर चमकण्यापर्यंतचा कलावंतांचा प्रवास हा अत्यंत जीवघेणा असतो. या इंडस्ट्रीत गॉडफादर, नशीब आणि तुमच्यातली गुणवत्ता यांचा मेळ बसलाच योगायोगानं तर ठीकच; अन्यथा इथं टिकणं मुश्कीलच. अशा भयंकर परिस्थितीत आपल्या शर्तीवर काम करणारे कलावंत तसे दुर्मीळच. अपवादात्मक कलावंतांनाच हे साधतं.

या विश्वाचं दर्शन घडवणारी नाटकं मराठी रंगभूमीवर यापूर्वीही आलेली आहेत. अभिराम भडकमकरांचंच ‘याच दिवशी याच वेळी’, तसंच ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ ही त्यापैकी काही. ‘सवेरेवाली गाडी’ हे टीव्ही-विश्वाचं रोखठोक चित्रण करणारं नाटक लेखक-दिग्दर्शक वर्षां दांदळे यांनी महापालिका नाटय़स्पर्धेत सादर केलं होतं आणि त्यावर पुरस्काराची मोहोरदेखील उमटली होती. मैत्रेय थिएटरने या नाटकाचा प्रयोग यशवंत नाटय़मंदिरात लावला होता. तो पाहण्याचा योग आला आणि त्यात टीव्ही इंडस्ट्रीच्या अंधाऱ्या गुहेचं वास्तव दर्शन घडलं.

सुलू ही चाळीशीची एक मध्यमवर्गीय स्त्री-कलावंत. हौशी-प्रायोगिक नाटकांतून कामं करणारी. तिला आपल्यातले कलागुण व्यापक जनसमुदायासमोर दाखवण्यासाठी आता छोटय़ा पडद्यावर चमकायचं आहे. आणि त्याद्वारे नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवायची आस तिला लागलेली आहे. त्याकरता अनेक खटपटी करून ती एकदाची एका सीरियलमध्ये (दीड वाक्याचं का होईना!) काम मिळवते. या इंडस्ट्रीत पाय रोवायचे तर अथक मेहनत व संघर्षांविना पर्याय नाही, हे वास्तव तिला मंजूर आहे. आपल्या पहिल्यावहिल्या शूटिंगसाठी ती डोंबिवलीहून आपल्या घरून भल्या पहाटेच निघते. दिलेल्या वेळआधीच स्टुडिओत पोहोचते. पण तिथं कुणीच नसतं. एक माणूस इकडे तिकडे घाईगडबडीत तिला फिरताना दिसतो. ती त्याला शूटिंगबद्दल विचारायला जाते तेव्हा सफाई कामगार समजून तो तिला कचरा काढायला सांगतो. आपल्याबद्दल त्याचा काहीतरी गैरसमज झालाय हे तिच्या लक्षात येतं. ती त्याला आपण कलाकार असल्याचं सांगू बघते; पण तो इतका गडबडीत असतो की तिचं म्हणणं ऐकून घ्यायला त्याला वेळ नसतो. हळूहळू स्पॉटबॉय, असिस्टंट डायरेक्टर आणि कलाकार मंडळी येऊ लागतात. पण कुणीच तिची दखल घेत नाही. ती उमेद न हरवता स्वत:हूनच प्रत्येकाशी ओळख करून घेण्याचा, त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करीत राहते. या प्रत्येकाचं एक स्वतंत्र विश्व आहे. त्यातले ताणतणाव, संघर्ष, असूया, स्पर्धा, हेवेदावे यांत ही मंडळी व्यग्र आहेत. नवागताला या इंडस्ट्रीत जसं वागवलं जातं तसंच सुलूलाही वागणूक मिळते. ती मात्र त्यांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या परीनं त्यांच्याशी सलगी करू पाहते. पण कुणीही तिच्याशी धड बोलत नाही. ना तिची दखल घेत. सुलूला अशा व्यवहाराची सवय नसते. पण तरीही ती स्वत:ची समजूत घालत राहते. यादरम्यान, नवऱ्याचं तिच्या शूटिंगच्या लांबलेल्या वेळेनं कावणं, वयात आलेल्या मुलीची प्रथमच पाळी आल्यानं तिची झालेली नाजूक अवस्था.. हे आणखीन घरचे ताण तिची सत्त्वपरीक्षा पाहतात. या सगळ्याला तोंड देत ती भुकेल्या पोटी आपल्याला शूटला कधी बोलावणार याची दिवसभर वाट बघत राहते. मात्र, दिवसभराच्या ताणतणवांनी पार गळपटलेल्या सुलूचं शूट रात्री खूप उशिरा सर्वाचं शूटिंग आटोपल्यावर पॅकअप करता करता कसंबसं उरकण्यात येतं. दिवसभराची प्रतीक्षा, कमालीची उपेक्षा, अपमान, उपाशी पोट, ताणतणाव आणि विचारांनी श्रमलेलं मन अन् शरीर यामुळे तिला तिच्या वाटय़ाचा दीड वाक्याचा संवादही धडपणे उच्चारता येत नाही. वर ‘कुठून आणतात असली माणसं पकडून?’ असे उद्विग्न उद्गार काढून डायरेक्टरही तिच्या मनाचा पार चोळामोळा करतो.

तोवर मध्यरात्र होत आलेली. ती कशीबशी स्टेशन गाठते. पण तोवर शेवटची गाडीही निघून गेलेली. आता सकाळच्या पहिल्या गाडीपर्यंत नाइलाजानं प्लॅटफॉर्मवर थांबण्याखेरीज गत्यंतर नसतं. ती घरी फोन करून तसं कळवते. एव्हाना प्रचंड थकलेली सुलू एका बाकडय़ावर बसते. शेजारी एक वेश्या मोबाईलवरून कुणा गिऱ्हाईकाशी सौदा करत असते. सुलूला आपल्यासारखीच वेश्या समजून ती तिच्याशी बोलू लागते. आपलं धंद्याचं तत्त्वज्ञान तिला ऐकवते. तिचं बोलणं सुलूला आधी नीटसं कळत नाही, पण नंतर तिच्या ध्यानात येतं, की ही आपल्याला वेश्या समजतेय. सुलू त्यावर खुलासा करण्याच्या भानगडीत पडत नाही. तिचं आणि आपलं जग फार वेगळं नाही, हे तिला मनोमन जाणवतं..

‘सवेरेवाली गाडी’च्या लेखक-दिग्दर्शक वर्षां दांदळे या हौशी-प्रायोगिक रंगमंचावरील एक गुणी कलावंत. टीव्ही माध्यमातही त्या काम करतात. स्वाभाविकपणेच त्यांनी या क्षेत्राबद्दलचे आपले अनुभव ‘सवेरेवाली गाडी’मध्ये रेखाटले असावेत. नवोदित कलावंताला या माध्यमात येणारे हे अनुभव सार्वत्रिक असले तरी त्याबद्दल उघडपणे बोलणं प्रत्येकजण टाळतो. एखादी व्यक्ती अतिशय संवेदनशील असेल तर तिला ज्या कटु अनुभवांतून इथे जावं लागतं तशा प्रकारची सुलू आहे. साहजिकपणेच सकाळ ते मध्यरात्र यामधल्या काळात सुलूला सीरियलच्या सेटवर मनुष्यस्वभावाचे जे विश्वदर्शन घडते ते वास्तवदर्शी रूपात वर्षां दांदळे यांनी यात चित्रित केले आहेत. मनोरंजन वाहिन्यांच्या झगमगत्या दुनियेत नशीब आजमवायला येणाऱ्या होतकरू कलावंतांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं हे नाटक आहे. लेखिकेनं ते जसं अनुभवलं तसं या नाटकात उतरलं आहे. त्यामुळे त्यात एक अस्सलता आहे.  या कटु अनुभवाकडे पाहण्याचा लेखिकेचा दृष्टिकोनही त्यातून प्रतीत होतो. सुलू ही सरळमार्गी, सोशीक, सहसा कुणाच्या अध्यामध्यात पडू न इच्छिणारी एक कलावंत आहे. पण अशा कलावंताच्या वाटय़ालाही या आभासी विश्वात जे कडवट अनुभव येतात ते सुन्न करणारे आहेत. वर्षां दांदळे यांनी ते अत्यंत प्रामाणिकपणे यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाटकात साधी-सोपी मांडणी, क्वचित प्रतीकात्मकतेचा सोस, लेखन-सादरीकरणात नवागताचं कच्चेपण या गोष्टी असल्या तरी विषय आणि आशयाप्रती नाटककर्तीची असलेली बांधिलकी अन् सच्चेपण जाणवल्याविना राहत नाही. सुलूनं एका क्षणी संयमावरील ताबा सुटून हिरोईन आणि स्पॉटबॉयच्या कानाखाली वाजवण्याच्या प्रसंगाचं पुढे काय होतं, हे नाटकात दाखवलेलं नाही. हे कसं काय? काही प्रसंगांत पात्रांची एन्ट्री-एक्झिटही अनावश्यक वाटते. या काही त्रुटी जाणवल्या तरी प्रयोग मात्र परिणामकारी होतो. यातली पात्रं वास्तववादी वाटण्याइतपत त्यांच्या कृती व लकबींवर दिग्दर्शक म्हणून वर्षां दांदळे यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे सगळी पात्रं यथायोग्य व चपखल वाटतात.

सुलूच्या भूमिकेत स्वत: वर्षां दांदळे यांनी होतकरू कलावंताची टीव्ही इंडस्ट्रीत होणारी अक्षम्य उपेक्षा, कोंडी आणि फरपट उत्तम दर्शविली आहे. त्यातही मध्यमवयीन कलावंताच्या वाटय़ाला ती अधिकच येते. तृप्ती वालावलकर यांनी वेश्येचं जगणं, तिनं आयुष्याशी केलेला समझोता आणि जगण्याविषयीचं तिचं तत्त्वज्ञान आंतरिक उमाळ्यानं पोहोचवलं आहे. घनश्याम घोरपडेंचा प्रॉडक्शन मॅनेजर वास्तववादी आहे. सुनील मोटेंचं स्पॉटबॉयचं छोटंसं कामही लक्षवेधी झालंय. गजानन उबाळेंनी असिस्टंट डायरेक्टरची व्यथा-वेदना नेमकेपणानं हेरली आहे. मेघा कोळंबकर (हेअर ड्रेसर), नित्यानंद सावंत (डायरेक्टर), मंजिरी राऊत (हिरोईन), सचिन सिंह (हिरो), श्यामा दहबरा (दुसरी बाई), सुहास नामे (संशयित) आणि रश्मी लुकतुके (फोनवर बोलणारी स्त्री) या सर्वानीच चोख कामं केली आहेत. तांत्रिक बाबीही ठीक.

‘सवेरेवाली गाडी’ हे शीर्षक काहीसं रोमॅंटिक असलं तरी टीव्हीच्या झगमगाटी विश्वाची अंधारी बाजू दाखवणारं हे नाटक एका कलावंताचा साक्षात्कारी प्रवासही अधोरेखित करतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Articles in marathi on marathi natak