गुन्हे पत्रकारितेला, कथा-कादंबऱ्यांना जगातील सार्वत्रिक भाषांमध्ये सदोदित जितक्या मोठय़ा प्रमाणावर वाचकवर्ग असतो, तेवढाच गुन्हेपटांनाही दर्शकवर्ग मिळतो. फक्त या गुन्हेपटांची गरज असते ती अधोजगताला पुरून उरणाऱ्या नायकाची. अर्नॉल्ड श्वात्झनेगर ते निकलस केज आणि जॅकी चान ते ब्रुस विलीसपर्यंत साऱ्याच अभिनेत्यांचा उद्धार हा त्यांच्या खलवृत्ती निवारक भूमिकांच्या सिनेमांनी झाला आहे. अगदी अलीकडच्या काळातला चांगला पोलीसपट कुणाला पाहायचा असेल त्यांनी शेकडो पारंपरिक पोलीसपटांचे विडंबन करून तयार झालेला एडगर राईटचा ‘हॉट फझ’ पाहावा. सायमन पेग याच्या अभिनय आतिषबाजीत विनोदी ढंगाने गंभीर गुन्हेउकलीचा प्रकार त्यात मिळू शकतो. या सिनेमासोबत कोएन ब्रदर्स यांच्या सिनेमांमधल्या गुन्हेनाटय़ाशी जवळीक साधणारा एक ताजा सिनेमा गेल्या दोन-तीन आठवडय़ांत सिनेवर्तुळात गाजतोय. ‘स्मॉल टाऊन क्राइम’ नावाचा हा सिनेमा सध्याच्या ऑस्कर माहोलाच्या धबडग्यात आवर्जून वेळ काढून अनुभवावा असा आहे.

‘स्मॉल टाऊन क्राइम’ला उत्कृष्ट पटकथा नसती, उत्कृष्ट दिग्दर्शन नसते किंवा उत्कृष्ट दृश्यमालिका नसती तरी केवळ जॉन हॉक या गुन्हेपटासाठी अपारंपरिक ठरणाऱ्या अभिनेत्याच्या बळावर तो तरला असता. पण इतर साऱ्या घटकांची मुबलकता असल्यामुळे चित्रपट अधिक आकर्षक बनला आहे. जॉन हॉक हा हॉलीवूडच्या पहिल्या फळीतील अभिनेता आत्तापर्यंत कधीच नव्हता.  त्याच्या अभिनयातला कस ‘मी अ‍ॅण्ड यू अ‍ॅण्ड एव्हरीवन वी नो’ या मिराण्डा जुलैच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतून स्पष्ट झाला होता. शेकडो लोकप्रिय  सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्यांच्या शेजारी उभे राहण्याच्या छोटय़ा भूमिकाही तन्मयतेने वठवत या कलाकाराने ऑस्करच्या फेऱ्यामध्ये स्वत:ला नेले. गेल्या काही वर्षांत वाटेला आलेल्या इंडिपेण्डण्ट सिनेमांतील साऱ्याच प्रमुख कामांचे त्याने सोने केले. आता ‘स्मॉल टाऊन क्राइम’मुळे हॉलीवूडच्या मुख्य धारेत शिरण्याची त्याची वाट सुकर झाली आहे.

लेखक-दिग्दर्शक इशोम नेल्म्स आणि इयन नेल्म्स या बंधुराजांनी तयार केलेल्या या सिनेमात सुरुवातीलाच माइक केंडल (जॉन हॉक) ही पेताड व्यक्ती आपल्याला  मद्यपानासोबत घरातील व्यायामशाळेत अतिगांभीर्याने व्यायाम करताना दिसते. त्याने मद्यपानामुळे पोलिसाची नोकरी गमावली असते. पोलीसपदाची जरब ओसरल्यामुळे गावातला सन्मान विरलेल्या दुरवस्थेत त्याची मद्य आराधना सुरू राहते. ज्या घरात तो दत्तक गेला त्यातील मदतशील कृष्णवंशीय नातेवाईकांपलीकडे त्याचे कुणीही आप्त नसतात. अपमानग्रस्ततेमुळे  मद्यातिरेकामुळे एका रात्री गाडीसह माइक आडभागात भेलकांडतो. शुद्धीवर आल्यावर घरी परतताना वाटेत त्याला निर्घृणपणे मारहाण झालेली तरुण मुलगी दिसते. तिला तो इस्पितळात दाखल करतो. मात्र तिचा मृत्यू होतो आणि नसते लचांड माइकच्या मागे लागते. पण त्यामुळे अचानक त्याच्यातला मद्यनिद्रेत गेलेला पोलीस जागा होतो. आपले निलंबन विसरून माइक खुन्याला शोधण्याची स्वतंत्र कार्यपद्धती तयार करतो. कोणताही पुरावा नसताना त्याच्या हाती खुन्यापर्यंत पोहोचण्याचा एक धागा लागतो. कार्यरत पोलिसांशी वाद घालत, हत्या झालेल्या मुलीच्या घरी खासगी तपासकर्ता म्हणून समोर जात आणि त्या छोटय़ा गावातील अधोलोकाची तपासणी करत माइकचे निष्णात काम सुरू होते. पण या खुनाचा तपास घेताना हत्या झालेल्या मुलीच्याच आणखी एका मैत्रिणीची हत्या होते. माइक गुन्हेगाराच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पुरावे नष्ट करण्यासाठी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची हत्या करण्यासाठी नवी यंत्रणा उभी झालेली असते.

‘स्मॉल टाऊन क्राइम्स’ क्लासिक वेस्टर्नपटांसारखे रहस्य आणि वातावरणनिर्मिती करतो. माइक एका खुनाच्या वाकडय़ा मार्गाने केलेल्या तपासात त्या छोटय़ाशा गावात चालणाऱ्या कुकर्माच्या कित्येक गोष्टींशी परिचित होतो. मग गावात चालणाऱ्या बारा भानगडींचा हत्यांशी संबंध उकलल्यानंतर खलप्रवृत्तींशी दोन हात करण्यासाठी तो सज्ज होतो.

बंदुकीची चलाख हाणामारी, पुरावे नष्ट करण्यासाठी आलेले क्रूर भाडोत्री मारेकरी आणि त्यांचा रक्ताळू थैमान असा बराच पारंपरिक ऐवज चित्रपटात आहे. पण चित्रपट टेरेन्टीनो किंवा कोएन ब्रदर्सचा नसून नेल्म्स ब्रदर्सचा असल्याने त्यांच्या गुन्हेपटांच्या क्लींट इस्टवूड छापाच्या अनेक धारणा या सिनेमामध्ये डोकावल्या आहेत. मनोरंजक तो आहेच, पण सोबत प्रवाही आणि पकडून ठेवण्याची क्षमता बाळगणारा असल्याने या सिनेमाच्या वाटेला गेल्यास तो जराही निराश करणार नाही.