आर्यन खानच्या अटकेवरुन जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले “बॉलिवूड इंडस्ट्री…”

सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी, दिग्गज कलाकार यांसह इतरांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असे जावेद अख्तर म्हणाले.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार शाहरुखला जाहीर समर्थन देत आहेत. तर दुसरीकडे काही जण शाहरुख आणि आर्यनबद्दल उलटसुलट चर्चा करताना दिसत आहेत. नुकतंच याप्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींना तपासाच्या नावाखाली जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असे विधान जावेद अख्तर यांनी केले. यावेळी त्यांनी शाहरुखसह आर्यनलाही समर्थन दिले.

मुंबईतील जुहू परिसरात चेंजमेकर्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जावेद अख्तर यांनी हजेरी लावली. यावेळी दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रसारमाध्यमांनी त्यांना शाहरुख आणि आर्यन खानच्या अटकेबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी जावेद अख्तर यांनी थेट यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांनी शाहरुखाला पाठिंबा दिला आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी, दिग्गज कलाकार यांसह इतरांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असे जावेद अख्तर म्हणाले.

जावेद अख्तर नेमंक काय म्हणाले?

“काही दिवसांपूर्वी एका बंदरावर (अदानीचे बंदर) एक अब्ज डॉलर्स किमतीचे कोकेन सापडले होते. तर दुसरीकडे त्याचवेळी एका क्रूझवर १२०० लोकांची तपासणी केली जाते. त्यावेळी त्या ठिकाणी दीड लाख किंमतीचे चरस सापडतो. क्रूझवर अंमली पदार्थ सापडले ही एक मोठी राष्ट्रीय बातमी होते.मात्र दुसरीकडे अब्ज डॉलर्स कोकेन सापडले त्याची साधी हेडलाईनही कुठे पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी ही बातमी पाचव्या किंवा सहाव्या पानावर छापलेली दिसते. यानंतर मग असं म्हटलं जाते की, आम्ही यापुढे जहाजाला या बंदरावर येऊ देणार नाही. अरे पण यापूर्वी तुम्हाला जे मिळालं आहे, त्याबद्दल तर बोला,” असे विधान जावेद अख्तर यांनी केले.

“बॉलिवूड इंडस्ट्री हायप्रोफाईल असल्याची किंमत चुकवतयं”

यापुढे जावेद अख्तर म्हणाले, “बॉलिवूड इंडस्ट्री हायप्रोफाईल असल्याची किंमत चुकवत आहे. जेव्हा तुम्ही हायप्रोफाईल असता, त्यावेळी तुम्हाला खाली खेचण्यास, तुमच्यावर दगडफेक करण्यास, चिखलफेक करण्यास सर्वांना आनंद मिळतो. पण जर तुम्ही कोणीही नसाल, तर मग तुमच्यावर चिखलफेक करण्यास कोणाला आनंद मिळेल?” असा सवालही जावेद अख्तर यांनी उपस्थित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan arrest film industry pays price for being high profile says lyricist javed akhtar nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या