“पप्पा, आम्हाला…”, आर्यन खानसोबत कैदेत असलेल्या अरबाझ मर्चंटची वडिलांना विनवणी!

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

aryan khan and arbaaz merchant
आर्यन खान आणि अरबाज मर्चंट (संग्रहीत छायाचित्र)

बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या तुरुंगात असून अजूनही त्याच्या सुटकेची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर त्याच्यासोबत अटकेत असलेल्या अरबाज मर्चंटच्या माध्यमातून त्यांची तुरुंगातली स्थिती समोर आली आहे. ईटाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार अरबाज मर्चंटचं त्याच्या वडिलांशी दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बोलणं झालं. अवघ्या तीन मिनिटांच्या या कॉलमध्ये अरबाज मर्चंटनं त्याचे वडील असलम मर्चंट यांना विनवणीच्या स्वरात त्यांची तुरुंगातली स्थिती सांगितल्याचं असलम मर्चंट यांनी सांगितलं आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी जामिनासाठी केलेला अर्ज एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. येत्या मंगळवारी अर्थात २६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होणार आहे.

“त्याच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न”

दरम्यान, पेशानं व्यावसायिक असलेल्या असलम मर्चंट यांनी आपल्या मुलाविषयी वाटणारी चिंता बोलून दाखवली आहे. “मला माझा मुलगा अरबाजशी सुनावणीनंतर बोलायचं होतं. मी त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय, पण त्याचा काहीही उपयोग नाही झाला. मी खार पोलीस स्टेशनला जाऊन माझा मोबाईल नंबर देखील देऊन आलो आहे, जेणेकरून मला माझ्या मुलाशी बोलण्याची एक संधी मिळेल. माझ्या मुलाला आता जनरल बरॅकमध्ये हलवलं आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे”, अशा शब्दांत असलम मर्चंट यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे.

“मला अजिबात माहिती नाहीये की तो नक्की कसा आहे. जेलच्या आतमध्ये काय घडतंय, हे देखील मला माहिती नाहीये. तो कशा प्रकारच्या लोकांसोबत बरॅकमध्ये राहतोय आणि त्याच्या अवती-भवती कोण आहे, हे देखील मला माहिती नाही”, असं असलम यांनी नमूद केलं.

“त्याच्या चेहऱ्यावर भिती दिसत होती…”

दरम्यान, असलम मर्चंट यांनी अरबाज मर्चंटसोबत झालेल्या तीन मिनिटांच्या व्हिडीओ कॉलविषयी सांगितलं आहे. “गेल्या वेळी त्याच्यासोबत फक्त तीन मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलणं झालं. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भिती दिसत होती आणि तो वारंवार सांगत होता की तो निर्दोष आहे. त्याचा गळा दाटून आला होता. ‘पप्पा, आम्हाला इथून बाहेर काढा, आम्ही निर्दोष आहोत’, असं तो मला सांगत होता”, असं असलम मर्चंट म्हणाले.

“या वयाच्या मुलांना अशी वागणूक देणं चूक”

आर्यन खान, अरबाज मर्चंट यांना दिल्या जात असलेल्या वागणुकीविषयी देखील असलम मर्चंट यांनी तक्रार केली. “मी माझ्या मुलाला अशा स्थितीत नाही पाहू शकत. ज्यांच्या निर्दोष मुलांना अशी वागणूक दिली जात असेल, अशा पालकांची स्थिती तुम्ही समजू शकत असाल. त्यांना एनसीबीसोबत सहकार्य केल्यानंतर जामीन दिला जाऊ शकला असता. पण या वयाच्या मुलांना अशी वागणूक देणं अन्यायकारक आहे”, असं ते म्हणाले.

“या देशाच्या भविष्याचं काय होईल? इतर काहींना चौकशीविनाच सोडून देण्यात आल्यानंतर फक्त या दोन मुलांनाच लक्ष्य करणं अन्यायकारक आहे. त्यांच्या भवितव्याचं काय होईल? हे फक्त अरबाजच्या भवितव्याविषयी नसून त्याच्या मलीन झालेल्या प्रतिमेविषयी आहे”, अशा शब्दांत असलम मर्चंट यांनी आपली व्यथा मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan friend arbaaz merchant conversation with father drugs case pmw

फोटो गॅलरी