बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे संपूर्ण देशातच मोठी खळबळ माजली आहे. २ ऑक्टोबरला एनसीबीने टाकलेल्या छाप्यात आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेव्हा पासूनच आर्यन आर्थर रोड जेलमध्ये गजाआड आहे. बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यनच्या जामीनावर २६ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आर्यन खानच्या कारावासात वाढ झाल्याने आता त्याने अटकेपूर्वी आखलेले काही प्लॅन्स त्याला रद्द करावे लागले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार आर्यन खान नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत रोड ट्रीपला जाणार होता. मात्र आता कारावासात वाढ झाल्याने आर्यन खानची ही रोड ट्रीप रद्द होण्याची शक्यता वाढलीय. या वृत्तानुसार आर्यनचे अमेरिका आणि ब्रिटनमधील मित्र या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तसचं आर्यनचे जवळचे मित्र त्याची आई गौरी खान आणि सुहानाकडून या केस संदर्भातील सर्व अपडेट वेळोवेळी घेत असल्याचंही कळतंय.

‘त्या’ चर्चांनंतर अखेर समांथाने यूट्यूब चॅनेल्स विरोधात दाखल केला मानहानीचा दावा


दरम्यान, आर्यन खानला अटक झाल्यानंतर आज म्हणजेच २१ ऑक्टोबरला शाहरुखखानने पहिल्यांदाच आर्थर रोड जेलमध्ये जाऊन मुलाची भेट घेतली आहे. ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. शाहरुख येणार असल्याची यावेळी कुणालाही कल्पना नव्हती.

साधी कार, अचानक भेट आणि १० मिनिटांची चर्चा; शाहरुख-आर्यन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.