‘इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’, हा ह्या ऑक्टोबरमधील डिस्कव्हरी प्लस वरील एक्स्क्लुझिव्ह आणि अतिशय बहुप्रतीक्षित असा शो आहे. जगातील सुप्रसिद्ध साहसपटू बेअर ग्रिल्स भारतातील चिरतरुण अभिनेता अजय देवगणसोबत साहसाने भरलेल्या थरारक मोहीमेवर सोबत दिसणार आहे. जेव्हा ही जोडगोळी खवळलेला समुद्र आणि हिंदी महासागरातील दुर्गम बेटावर जाताना शार्क्स आणि इतर संकटांचा सामना करेल, तेव्हाचा हा खिळवून टाकणारा अनुभव बघण्याची अनेकजण वाट बघत आहेत.

शोमध्ये सांगितला अनुभव

अजय म्हणतो, “होय, मी अनेक स्टंटस केले आहेत, कारण जेव्हा आम्ही फिल्म्समध्ये स्टंटस करायला सुरुवात केली तेव्हा कोणतीही साधने (हारनेसेस) नव्हती. त्यामुळे आम्हांला ३० किंवा ४० फुटांवरून उडी मारावी लागायची. तेव्हा तुम्हांला बॉक्सेसवर पडावे लागायचे आणि शक्यतो नेहमीच तुमचा घोटा किंवा दुसरा अवयव मोडायचा. तुम्ही जमिनीवर पडणार तेव्हा तिथे कोणतीही क्रॅश मॅट नसायची. त्यामुळे तेव्हा आम्ही हे खरेच स्टंट करत असायचो.”

अजय देवगणने काढली वडलांची आठवण

आपल्या वडिलांबद्दल बोलताना अजय म्हणाला, “आपले पालक गमवणे बिकट असते. कारण आपल्या आयुष्याच्या पहिल्या २० वर्षांमध्ये आपण त्यांची फिकीरच करत नसतो. आपल्याला वाटते की त्यांना काहीच कळत नाही, ते वेडे आहेत आणि आपल्यालाच सगळे कळते. आणि जेव्हा आपल्याला मुले होतात, तेव्हा पालक असणे म्हणजे काय आणि त्यांनी खरोखर काय केले होते, हे आपल्याला कळू लागते. आणि कधीकधी त्या गोष्टीला फार उशीर झालेला असतो.” त्याने म्हंटले की, “त्यांना अल्झायमर्सचा त्रास होत होता व त्यांनी केलेल्या स्टंटसमुळे अनेक दुखापती झाल्या होत्या. ते तरुण असताना एकदा त्यांना काच तोडून जावे लागले होते आणि त्या काळी काच तोडणे हे खरोखर काच तोडणे असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर ४५ टाके घातले होते.”