गेल्या वर्षापासून अभिनेता अक्षय कुमार हा खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा खिलाडी असल्याचे त्याच्या चित्रपटांच्या निवडीतून दिसून येतेय. २०१६ या वर्षी अक्षय कुमारचे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटातून विविध धाटणीच्या भूमिका साकारत अक्कीने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१६ मध्येच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटातून त्याने साकारलेली नौदल अधिकारी रुस्तम पावरीची व्यक्तिरेखा अनेकांनाच भावली. त्याच्या या भूमिकेची दखल घेत भारत सरकारने अक्षयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे.

अक्षयला हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय. त्याचे चाहते विविध मार्गांनी सध्या हा आनंद व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक शंकर शण्मुघम यांनी ट्विटरवरुन अक्षयला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करत आगामी ‘रोबोट २.०’ या चित्रपटातील त्याचा नवा लूक दाखवणारा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यामुळे खिलाडी कुमारच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला असणार यात शंकाच नाही.

‘रोबोट २.०’ या चित्रपटामध्ये अक्षयसोबत सुपरस्टार रजनीकांत सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने पॉवरपॅक असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु असून यंदाच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटामध्ये अक्षय डॉ. रिचर्ड या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी कधीही न पाहिलेल्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.