Asaduddin Owaisi reaction on Dhurandhar 2 movie: लोकसभेचे खासदार आणि एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही आता धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य धरने दिग्दर्शित केलेला आणि रणवीर सिंह अभिनित धुरंधर चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रोपगंडा असलेला चित्रपट म्हणून काही जण त्यावर टीका करत आहेत. तर अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. भारतात धुरंधर चित्रपटावरून दोन गट पडल्याचे दिसते. राजकीय आणि संवैधानिक बाबींवर नेमके भाष्य करणाऱ्या ओवैसींच्या विधानामुळे आता पुन्हा एकदा चित्रपटाची चर्चा होत आहे.
एका कार्यक्रमात बोलत असताना ओवैसी म्हणाले, धुरंधर हा चित्रपट अतिशय निरर्थक (बकवास) आहे. तसेच तो हिंसाचाराला प्रोत्साहन देतो. टाइम्स नाऊने आयोजित केलेल्या चर्चेत ओवैसी सहभागी झाले होते. यावेळी त्यांना धुरंधर चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, हा काय चित्रपट आहे का? तीन तास निव्वळ निरर्थक जातात.
ओवैसी पुढे म्हणाले, चित्रपट पाहण्यासाठी माझ्याकडे तीन तास नाहीत. लोकांनी माझे बोलणे एक तास ऐकावे, एवढीच अपेक्षा मी करू शकतो. शिवीगाळ आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याऐवजी त्या चित्रपटात दुसरे काही नाही. तीन तास चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय प्रश्न येतात? हे सर्व पाहायला कुणाला वेळ आहे?
सध्या संपूर्ण जगात धुरंधरची क्रेझ असून अनेकांना चित्रपट पाहून आनंद मिळतो, असाही प्रश्न यावेळी ओवैसी यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, आम्ही हैदराबादमध्ये बोलतो त्याप्रमाणे, या गोष्टी फार मनावर घेऊ नका, त्या स्मशानात जाऊ द्या. म्हणून आम्ही या गोष्टी फार मनावर न घेता सोडून देतो.
धुरंधर चित्रपटाबद्दल
आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओज आणि बी ६२ स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. धुरंधरचा पहिला भाग ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागाने भारतात ८४० आणि जगभरात १३०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली होती.
यावर्षी १९ मार्च रोजी धुरंधरचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. अवघ्या काही दिवसात धुरंधरच्या दुसऱ्या भागाने भारतात ७१५ तर जगभरात मिळून ११२८ कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. २०२६ मधील आतापर्यंतचा हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
बॉलीवूडपासून दाक्षिणात्य कलाकारही चित्रपटाचे कौतुक करत आहेत. विशेषकरून दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अभिनेते ‘धुरंधर २’बद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीसुद्धा ‘धुरंधर २’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
एक्सवरून रजनीकांत आदित्य धरच्या ‘धुरंधर २’बद्दल म्हणाले, “काय कमाल चित्रपट आहे… ‘धुरंधर २’. आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप. रणवीर सिंह आणि चित्रपटातील कलाकार व इतर सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा! प्रत्येक भारतीयाने पाहावा असा चित्रपट. जय हिंद”.
