Asha Bhosle Life Struggle: गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. संगीताच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आशाताईंचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. एका बाजूला अफाट यश तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आयुष्यात सोसावे लागलेले दुखाचे डोंगर. आशाताईंच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक काळ म्हणजे २०१२ मध्ये झालेला त्यांची मुलगी वर्षा भोसले यांचा मृत्यू. या धक्क्यातून सावरत असतानाच २०१५ मध्ये त्यांनी आपला मुलगा हेमंत भोसले यांनाही गमावले. तीन वर्षांच्या अंतरात दोन अपत्ये गमावल्यानंतरही, त्यांनी संगीताची साथ सोडली नाही. त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या भावाने दिलेला सल्ला आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

आशा भोसलेंचे लग्न व मुलं

आशा भोसले यांनी दोन लग्नं केली. त्यांचा पहिला विवाह अगदी कमी वयात गणपतराव भोसले यांच्याशी झाला होता. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केलं होतं. आशाताईंना पहिल्या लग्नापासून तीन मुले झाली. हेमंत, वर्षा आणि आनंद अशी त्यांची नावं. त्यांचा मोठा मुलगा, हेमंत भोसले यांनी संगीतात करिअर केलं. तर आनंद भोसले यांनी आशाताईंचं काम आणि इतर व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांची मुलगी, वर्षा भोसले पत्रकार होत्या. त्यांनी काही हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी गायनही केलं होतं. गेल्या काही वर्षांत, त्यांची नात जनाई भोसले सावलीसारखी त्यांच्याबरोबर असायची.

आशाताईंच्या मुलीचं निधन

आशाताईंच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक काळ म्हणजे २०१२ मध्ये झालेला त्यांची मुलगी वर्षा भोसले यांचा मृत्यू. वर्षा या दीर्घकाळापासून नैराश्याशी झुंजत होत्या आणि त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. यापूर्वीही त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.

लतादीदी सतत रडत होत्या

या धक्कादायक घटनेबद्दल माहिती मिळाली तो क्षण आठवताना आशाताई ‘मुंबई मिरर’शी बोलताना म्हणाल्या होत्या की, “जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सिंगापूरमध्ये होते. घरच्यांना ही बातमी माझ्यापासून लपवून ठेवायची होती. पण माझा मुलगा आनंदला वाटलं की मला हे माहीत असायला हवं. मला हे समजल्यावर मी जागीच कोसळले. मला पहिल्या विमानाने लगेच घरी यायचं होतं. दीदीला (लता मंगेशकर) या घटनेचा खूप मोठा धक्का बसला आहे. त्या सतत रडत आहेत. मला वाटतं की त्यांना ही बातमी सांगायला नको होती. दीदी जास्त करून त्यांच्या खोलीतच असतात, त्यामुळे त्यांना हे समजलं नसते तरी चाललं असतं. पण जेव्हा ही घटना घडली, तेव्हा तिथे लोकांची इतकी गर्दी होती की हे लपवणं शक्यच नव्हतं.”

asha bhosle with her son and daughter
फोटो – एक्सप्रेस आर्काइव्ह

आशाताईंना दुःखातून सावरायला भावाने केली मदत

२०१३ मध्ये आलेल्या ‘माई’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना आशाताईंनी आपल्या दुःखाबद्दल सांगितलं होतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक रडतील, पण मी यासाठी रडेन कारण माझी मुलगी हा चित्रपट पाहायला माझ्याबरोबर नसेल, असं त्या म्हणाल्या होत्या.

“माझ्या मुलीला जे करायचं होतं ते तिने केलं. तिने स्वतःचा मार्ग स्वतः निवडला. तिने हा निर्णय घेतला खरा, पण मागे राहिलेल्यांचे खासकरून तिच्या आईचे काय होईल याचा विचार तिने केला नाही. पण आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या आपण कधीच बदलू शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं होतं.

भावाने दुःखातून सावरलं

या दुःखामुळे आशाताई पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या, पण त्यांच्या भावानेच त्यांना हळुवारपणे पुन्हा संगीताकडे वळवले. “माझ्या भावाने मला पुन्हा सावरलं. मी पूर्णपणे खचले होते. त्या रात्रीपासून मी लोकांना भेटणं बंद केलं होतं, कोणाशी बोलत नव्हते, फोनही उचलत नव्हते, माझ्यासाठी आता कशालाही महत्त्व उरलं नव्हतं. माझा भाऊ आला आणि त्याने माझ्या हातात तानपुरा दिला. त्याने मला गाणं सुरू करायला सांगितलं. तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण माझ्यासाठी तो एका गुरूंसारखा आहे,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

“भाऊ म्हणाला, ‘पंडित दीनानाथ मंगेशकरांचे स्मरण कर. ‘सा’ पासून सुरुवात कर, ‘ओम’ ने सुरुवात कर.’ मी गायला सुरुवात केली. पाच मिनिटांनंतर, हळूहळू माझ्या आत काहीतरी उलगडू लागलं, जणू एखादा मार्ग मोकळा होत होता. त्यानंतर मला ‘सा’ शिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. माझा आवाज, माझा स्वर, त्यात सूर आहे की नाही, तो किती काळ टिकतोय, मी कोणत्या रागात जातेय, पुढे काय गायला हवं… एकदा का मी त्या स्पेसमध्ये गेले की जगातील इतर कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व माझ्यासाठी उरले नाही. काहीच नाही. तिथे फक्त आणि फक्त संगीत होते,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

“तू शापित गंधर्वांपैकी एक आहेस”

“तो मला म्हणाला, ‘आपण ईश्वराच्या दरबारातील गंधर्वांसारखे आहोत. कधीकधी देव त्यांना शाप देतो आणि पृथ्वीवर पाठवतो. ते मोठे कलाकार होतात, सुंदर गातात, पण ते खऱ्या अर्थाने सुखी नसतात. त्यांना शाप मिळालेला असतो. तुला जे मिळालंय, ते पुढे नेणं हेच तुझे कर्तव्य आहे. वयाच्या सहाव्या-आठव्या वर्षापासून तू संगीत शिकत आहेस आणि आजही गात आहेस. तू त्याच शापित गंधर्वांपैकी एक आहेस. त्यामुळे तुला दुःख सोसावंच लागेल. ते दुःख कधीच पूर्णपणे जाणार नाही.’ पण या दुःखातून मार्ग काढण्याचा एकच उपाय आहे, गाणं. गात राहा. वेदना कायम राहतील, तू त्या विसरणार नाहीस, पण स्वतःला सावरण्याचा मार्ग तुला नक्की सापडेल,” असं आशा भोसलेंना भावाने म्हटलं होतं.

“त्यानंतर त्याने एक अशी गोष्ट सांगितली जी माझ्या मनात कायमची कोरली गेली. ‘सुख हे जगाला वाटण्यासाठी असतं, पण दुःख हे मनात साठवून ठेवायचं असतं. ते तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात ठेव. त्याबद्दल कधीही उघडपणे बोलू नकोस. कारण जो सतत रडतो, त्याच्याबरोबर कोणीही रडत नाही, लोक हसणाऱ्यांबरोबर हसतात. पण जो रोज आतल्या आत मरतोय, त्याच्यासाठी दररोज कोण शोक व्यक्त करणार? म्हणूनच कधीच तुझ्या दुःखाचं प्रदर्शन करू नकोस,'” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

भावाने सांगितलं त्याप्रमाणे आशा भोसले या सर्व दुःखातून बाहेर आल्या. “त्याचं बोलणं माझ्या मनात खोलवर रुजलं, जणू त्याने मला एखादा मंत्रच दिला होता. तेव्हापासून, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, मी गाण्याचा सराव करते,” असं त्या म्हणाल्या होत्या.

आशाताईंच्या मुलाचं निधन

मुलीच्या दुःखातून आशाताई सावरत असतानाच त्यांना दुसरा धक्का बसला. त्यांचा मुलगा हेमंत भोसलेंचे कॅन्सरमुळे २०१५ मध्ये निधन झाले. तीन वर्षांत त्यांनी दोन अपत्ये गमावली. यानंतरही आशा भोसले सक्रिय राहिल्या. त्यांनी काम करणं थांबवलं नाही. त्या कार्यक्रमांना हजेरी लावायच्या. अनेक रिअॅलिटी शोमध्ये बोलावल्यावर त्या उपस्थित राहायच्या. त्यांचा मुलगा आनंद भोसले त्यांच्या कामाचं व्यवस्थापन बघायचे. तर अलिकडच्या काळात त्यांची नात जनाई भोसले कायम त्यांच्याबरोबर असायची.