Asha Bhosle Death: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये अजय-अतुल, मंजिरी-प्रसाद ओक, रिंकु राजगुरू, भाग्यश्री, कमल हासन, प्राजक्ता माळी, जुई गडकरी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
आता काजोल, सुबोध भावे, हेमंत ढोमे या कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
“मला त्यांच्या सगळ्याच गोष्टी….”
काजोलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, “आशाताई आपल्यात होत्या, आहेत आणि कायम एक गायिका आणि उत्तम व्यक्ती म्हणून राहतील. मला त्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडायच्या. त्यांचं आयुष्यावरील प्रेम, खाण्याची आवड, त्यांची विनोदबुद्धी आणि अर्थातच त्यांचं पहिलं प्रेम, त्यांचं गायनही आवडायचं.”
तिने असेही लिहिले, “त्या त्यांच्या आवाजातून जे व्यक्त करत असत, ते आम्ही कॅमेरासमोर दाखवण्यात कदाचित कमी पडत असू. मी एकदा त्यांच्याबरोबर एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेले होते. ते गाणे कधीच रिलीज झाले नाही, तेव्हा मी १९ वर्षांची होते. त्यांनी जेव्हा गाणं गायलं, तेव्हा एखादा सिनेमा पाहिल्यासारखं वाटत होतं. भव्य हा एकच शब्द त्याचे वर्णन करू शकतो. आशाताई तुम्ही कायमच आमच्याबरोबर असाल, भावपूर्ण श्रद्धांजली”, असे लिहित काजोलने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“आपल्या आयुष्यातला सर्वात देखणा आवाज आज हरपला”
हेमंत ढोमेने लिहिले, “आपल्या आयुष्यातला सर्वात देखणा आवाज आज हरपला. आशाबाई आमचं जगणं समृद्ध केलंत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या कानात आणि मनात कायमचं घर करून जात आहात. भारतातील सर्वात रोमँटिक आवाजाला निरोप द्यावा लागत आहे.”
“इतक्या जिवंत माणसाला आणि कलाकाराला श्रद्धांजली कशी द्यायची आशाताई?”
सुबोध भावेने लिहिले, “इतक्या जिवंत माणसाला आणि कलाकाराला श्रद्धांजली कशी द्यायची आशाताई? गेली अनेक वर्ष तुम्ही तुमच्या आवाजाने अनेकांना सावरले, घडवले आणि पुढील कित्येक वर्षेही तसंच होईल. हा पराकोटीच्या आनंदाचा निर्मळ झरा आम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार नाही, पण त्याचे तुषार आम्हाला स्वरांनी चिंब करत होते आणि करत राहतील. सदैव तुमच्या ऋणात आहे. तुम्ही जिथे असाल तिथेही तुमच्या असण्याने स्वररुपी नवसंजीवनी द्याल, तुम्हाला वंदन आशाताई, ओम शांती”, असे लिहित भावना व्यक्त केल्या.
तसेच, कमल हासन यांनी चाची ४२० चित्रपटातील गाणं पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे.
दरम्यान, आशा भोसले यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
