Asha Bhosle Death : आशा भोसले नावाच्या एका युगाचा आज अंत झालाय. ध्रुवाने जसं आपल्या तपश्चर्येच्या बळावर आकाशात अढळपद मिळवलं होतं तसं संगीत क्षेत्रातलं अढळपद मिळवणारी गायिका म्हणजे आशा भोसले. त्यांच्या आवाजात कमालीचं वैविध्य होतं. भक्तीसंगीत, लावणी, गझल, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, पॉप, कॅब्रे अशा कितीतरी गायन प्रकारांचं शिवधनुष्य त्यांनी आपल्या मधुर आवाजाने लीलया पेललं. बहुढंगी असं ज्याचं वर्णन करता येईल अशा आवाजाची जादू लोकांच्या मनावर मागची आठ दशकं राज्य करत होती. याच आशाताईंनी रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी ही लावणी गाण्याच्या आधीची धमाल सांगितली होती.
रेशमाच्या रेघांनी लावणी बाबत आशाताई काय म्हणाल्या होत्या?
आशाताई म्हणाल्या होत्या, मला एकदा लतादीदीने (लता मंगेशकर) बोलवलं. मी घाबरले होते. मला वाटलं आता कशासाठी तरी ओरडा खावा लागणार. मी गेले तेव्हा दीदीने मला तिच्या खोलीत बोलवून घेतलं. ती पेटी घेऊन बसली होती. तिच्यामागे बाळ (हृदयनाथ मंगेशकर) बसला होता. दीदीने मला पाहिलं आणि म्हणाली हे बघ हे गाणं आलंय तुझ्यासाठी. मी त्यावेळी बाळकडे पाहिलं आणि खाली बसले. ते गाणं होतं रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढिला..दीदीने मला ते गाणं तिच्या पद्धतीने म्हणून दाखवलं. ते अगदी साध्या सरळ चालीत होतं. ते ऐकून मी हसू लागले. त्यावर मला दीदी म्हणाली आशा तुला याचसाठी बोलवलंय कारण तू वात्रट आहेस आणि तू हे गाणं बरोबर गाशील हे मला माहीत आहे. असं म्हणत दीदी (लता मंगेशकर) हसू लागली. त्यानंतर मी रेशमाच्या रेघांनी गायले. ही लावणी आजही लोकांच्या स्मरणात आहे असा किस्सा आशा भोसले यांनी २०१८ मध्ये सुरेश भट यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगतिला होता.
आशाताईंची गायन शैली लतादीदींपेक्षा वेगळी होती
एल्विस प्रेस्ले, कॅरमन मरांडा यांच्या गाण्यांच्या प्रभावातून आशा भोसले यांनी आपली गायन शैली दीदींपेक्षा वेगळी केली आणि ती लोकांना भावली. त्यामुळेच लता मंगेशकरांशी स्पर्धा असूनही आशाताईंचा आवाज हा कायम वेगळा वाटला. वेगळा ठरला. एखादा पक्षी जसा खुल्या आसमंतात मोकळेपणाने वावरतो अगदी तसंच त्यांच्या आवाजाचं स्वरुप होतं. त्या आवाजाला कुठल्याही मर्यादा किंवा कुंपणं नव्हती. आज हाच आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मागची आठ दशकं आशा भोसलेंनी वैविध्यपूर्ण गाणी गायली. आईए मेहरबा असो, मागे उभा मंगेश असो किंवा ऋतू हिरवा असो त्यांच्या आवाजाचा अवीट गोडवा आपल्या सगळ्यांसह कायम राहिल यात शंका नाही.
