Asha Bhosle Granddaughter Zanai Bhosle Emotional Video : आपल्या चिरतरुण आवाजाने अवघ्या जगाला भुरळ घालणा ऱ्या गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी रविवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवरच शोककळा पसरली आहे. रविवारी आशा भोसलेंचे पार्थिव लोअर परळ येथील ‘कासा ग्रँड’ या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसलेंच्या निवासस्थानी जाऊन, त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच संगीत क्षेत्रातील व्यक्ती आणि कलाकार मंडळींनीसुद्धा त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.

या शोकाकुल वातावरणात आशा भोसलेंची नात जनाई भोसले हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. आपल्या लाडक्या आजीला पोलिसांनी मानवंदना देताच जनाईला अश्रू अनावर झाले. व्हिडीओमध्ये जनाई वारंवार अश्रू पुसताना दिसत आहे. आजीच्या निधनानंतर जनाईला दु:ख आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्याच भावनांचा बांध फुटला आहे. व्हिडीओखालील कमेंट्समध्ये अनेकांनी आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जनाई भोसलेचे आजी (आशा भोसले) यांच्याबरोबर अतिशय घट्ट नाते होते. ती अनेकदा सोशल मीडियावर आशा भोसले यांच्याबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. तसेच अनेक कार्यक्रमांना आजी आणि नात एकत्र भेटीही द्यायचे. दोघींचा हा बॉण्ड अनेकांच्याच पसंतीस पडत असे. लाडक्या आजीच्या निधनानंतर जनाईला आजीच्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले आहेत.

आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. आशा भोसले यांच्या निधनाने मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्री व संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. गायक, गायिका, अभिनेते अन् अभिनेत्री यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली. सर्वांनीच आशा भोसलेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पोलिसांनी मानवंदना देताच नात जनाई भोसले भावुक

मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये गाणी गात आशा भोसलेंनी अवघ्या रसिक श्रोत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आज आशा भोसले आपल्यात नसल्या तरी त्यांच्या असंख्य गाण्यांद्वारे त्या कायमच रसिकांच्या मनात जिवंत राहतील.