Asha Bhosle Death: दिग्गज गायिका आशा भोसले यांचे अवयव निकामी झाल्याने निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसलेंना शनिवारी, ११ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज रविवारी, १२ एप्रिल रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. आशा ताईंचे पार्थिव लोअर परळ येथील ‘कासा ग्रँड’ या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवासस्थानी जाऊन आशा ताईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आशा भोसले यांच्यावर सोमवारी, १३ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आज त्यांचे पार्थिव लोअर परळ येथील त्यांच्या घरी नेण्यात आले. आशाताईंचे पार्थिव घरी नेल्यावर काही वेळेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या घरी गेले आणि श्रद्धांजली वाहिली.

“माझ्या आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालंय. उद्या सकाळी ११ वाजता, कासा ग्रँड लोअर परळ त्या जिथे राहायच्या त्याठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. ज्यांना अंत्यदर्शन करायचे असतील, त्यांनी तिथे यावं. त्यानंतर ४ वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील,” असं एएनआयशी बोलताना आनंद भोसले यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ-

आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. आशा भोसले यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्री व संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. गायक, अभिनेते, अभिनेत्री यांच्यासह राजकीय नेतेही आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

आशा भोसले यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक अजरामर गाणी गायली. आता आशाताई आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी, त्यांच्या आठवणी कायम चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील. १९७० च्या दशकात आर. डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘चुरा लिया है’ सारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. नी मराठी आणि हिंदीसह २० हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी १२,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली असून, त्यांच्या नावावर सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंगचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील नोंदवला गेला होता.