Asha Bhosle Passes Away: संगीत विश्वातील एक युग आज कायमचे अस्ताला गेले आहे. प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्राणज्योत आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात मालवली. वयाच्या ९२ व्या वर्षीही त्यांची सांगीतिक ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. आशा ताईंनी मराठी आणि हिंदीसह २० हून अधिक भारतीय व परदेशी भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से चर्चेत आहेत, ज्यामध्ये पांढऱ्या साडी नेसण्यामागचे कारणही त्यांनी एका मुलाखतीत उघड केले होते.

आशा भोसले यांनी अनेक गाणी आपल्या सुमधुर आवाजात अजरामर केली. त्यांनी नी मराठी आणि हिंदीसह २० हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली. त्यांनी १२,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली असून, त्यांच्या नावावर सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंगचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील नोंदवला गेला होता. शास्त्रीय संगीत, गझल, भजन, लावणीपासून ते आधुनिक पॉप आणि कॅबरे संगीतापर्यंत त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली.

पांढऱ्या साड्या का नेसायच्या आशा भोसले-लता मंगेशकर?

आशा भोसले व लता मंगेशकर या दोन्ही बहिणी पांढऱ्या साडच्या नेसायच्या. यामागचं कारण स्वतः आशा भोसले यांनी अमृता राव आणि आरजे अनमोल यांचा पॉडकास्ट ‘कपल ऑफ थिंग्ज’मध्ये सहभागी झाल्यावर सांगितलं होतं. “मी आणि दीदी याशिवाय आमच्या इतरही बहिणी… त्या काळात आम्ही सगळ्याजणी पांढऱ्या साड्या नेसायचो. आम्हाला असं वाटायचं की, पांढरी साडी आमच्यावर शोभून दिसते. जर रंगीत साड्या नेसल्या, तर आम्ही कदाचित आणखी सावळ्या दिसू असं वाटायचं. त्यामुळेच आम्ही पांढऱ्या साड्या नेसायचो. त्यानंतर मग मी गुलाबी साड्या नेसायला सुरुवात केली. तेव्हा दीदीने डोळ्यांनी एक कटाक्ष दिलेला की, हे कधी झालं? केव्हा झालं? पण, तेव्हापासून मग मी घरात गुलाबी साडी नेसायला सुरुवात केली. कोलकाता येथील साड्या तेव्हा स्वस्त असायच्या, मग तिथल्याच साड्या आम्ही जास्त नेसायचो,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

asha bhosle lata mangeshkar white saree reason
लता मंगेशकर व आशा भोसले यांचा फोटो (सौजन्य – Express archive photo by Pradeep Kocharekar)

“दीदी घरी अगदी सामान्यपणे वागायची. पण, ती माझ्याशी बाहेर खूप औपचारिक आणि सौम्यपणे बोलत असे. घरी आमचं एक वेगळं नातं होतं, आम्ही मराठीत बोलायचो. मात्र, गाण्याच्या बाबतीत आमच्यात कोणतंही नातं नव्हतं. ती बाहेर लता मंगेशकर होती आणि बाहेर तिचा स्वतःचा दर्जा होता,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले. त्यांच्या निधनाला ४ वर्षे झाली आहेत. या ४ वर्षांत लतादीदींबद्दल बोलताना अनेकदा आशा भोसले भावुक व्हायच्या. लता मंगेशकर यांचंही ब्रीच कँडी रुग्णालयात अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झालं होतं.