Asha Bhosle Passed Away at 92: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज, रविवारी (१२ एप्रिल २०२६) ला निधन झाले. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील गाणी गायली आहेत. संपूर्ण जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. कलाकारांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे.
आशा भोसले यांच्या निधनानंतर अजय-अतुल यांच्यासह कलाकार हळहळले
आशा भोसले यांच्या निधनानंतर कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. संगीतकार अजय-अतुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. “संगीताची आशा मावळली”, असे लिहित त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आशा भोसलेंचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “त्यांच्यासारखे कोणीच नाही.” मृणाल कुलकर्णी यांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, खूप दु:खद अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या जुई गडकरीने आशा भोसले गात असलेले गाणे शेअर केले आहे. ‘मेरा कुछ सामान…’ हे गाणे गात असलेला हा व्हिडीओ आहे. यावर जुईने हात जोडलेल्या इमोजी शेअर करत आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, “संगीतातील हिरा गमावला. गोड आवाजाच्या आशा भोसले आता आपल्यात नाहीत. भावपूर्ण श्रद्धांजली.”

प्रसाद ओक व मंजिरी ओक यांनी आशा भोसले यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी आशा ताई असे लिहिले आहे.
रिंकु राजगुरूने आशा भोसले यांचा एक फोटो शेअर करत भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहिले आहे.

आशा भोसले यांच्या निधनानंतर फक्त मनोरंजनसृष्टीतूनच नाही तर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
