Milind Gawali Shares An Emotional Post For Asha Bhosle : दिग्गज गायिका आशा भोसले यांचं ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. आशा भोसले यांना शनिवारी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. आशा भोसलेंच्या निधनानंतर कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंदीसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेकांनी आशा भोसले यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काहींनी त्यांच्याबरोबरचे जुने किस्से, आठवणीसुद्धा शेअर केल्या आहेत. अशातच अभिनेते मिलिंद गवळी यांनी आशा भोसलेंनी त्यांच्या चित्रपटासाठी गायलेल्या गाण्याची जुनी आठवण शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी आशा भोसले यांच्याबरोबरचा जुना फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, “खरंतर आशाबाईंसारखी माणसं आपल्याला कधी सोडून जाऊच शकत नाहीत. आपण जितके दिवस पृथ्वीवर आहोत, तितके दिवस त्यांची मधुर गाणी आपल्याजवळ कायमच राहणार आहेतच. आशाबाईंसारखी माणसं महान असतात, त्यांनी कलेच्या क्षेत्रामध्ये जे काही केलंय ते खूपच महान आहे. त्याला कोणीही रिप्लेस करू शकत नाही आणि मोजकी काही भाग्यवान माणसं आहेत ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, आशाबाईंना भेटायची संधी मिळाली आहे, त्या भाग्यवानांमध्ये मी ही आहे.”
“माझी आशाबाईंची एकदाच भेट झाली होती, ‘हे दान कुंकवाचं’ या सिनेमातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस वरळीच्या संवाद स्टुडिओमध्ये मी त्या सिनेमाचा नायक असल्यामुळे मला आमंत्रित केलं होतं. त्या काळामध्ये संपूर्ण गाणं वनटेक रेकॉर्ड केलं जायचं, ते अनुभवायचं भाग्य मला मिळालं होतं. अनिल मोहिले संगीत दिग्दर्शक, शांताराम नांदगावकर यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर आम्ही ते सुंदर गाणं एकत्र बसून ऐकलं. त्यानंतर आम्ही स्टुडिओतून बाहेर पडलो. त्या स्टुडिओच्या जिन्यावरून खाली उतरता-उतरता आशाबाईंनी मला विचारलं “कुठे राहतोस?”, मी म्हटलं “दादरला”, त्या म्हणाल्या “मी बांद्राला चालली आहे; ऑन द वे तुला दादरला सोडते”, अगदी समोरच माझी मारुती-800 मी पार्क केली होती. पण त्या सोडते असं म्हणाल्या आणि मी काही न बोलता “हो चालेल” म्हणून त्यांच्या गाडीत बसलो.”
यापुढे ते म्हणाले, “वरळी ते दादरदरम्यान आम्ही खूप गप्पा मारल्या. मग सिद्धिविनायकला त्यांनी मला सोडलं. पुढे मी पुन्हा वरळीला मागे जाऊन मी माझी गाडी पिकअप केली. त्यानंतर एकदा डॉक्टर तात्यासाहेब लहानेंशी एका स्टुडिओमध्ये बोलत असताना आशाबाईंचा त्यांना फोन आला होता. डॉक्टर लहान्यांनी त्यांचं बोलून झाल्यावर फोन माझ्याकडे दिला म्हणाले “आशाबाई आहेत, त्यांच्याशी बोला”. तो एक संवाद आणि आमची ती एक भेट, आयुष्यभर स्मरणात राहिल. आशाताई आपल्यात नाहीयत, असं म्हणणं मला पटत नाही. माझ्या जन्मापासून त्या आपल्यात होत्या आणि आपण असेपर्यंत, त्या राहणार आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो…”
