Asha Bhosle funeral: प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास निधन झाले. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लोअर परेल येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी कला, क्रीडा, राजकीय तसेच समामाजिक क्षेत्रातील हस्ती हजेरी लावत आहेत. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी देखील आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी सचिन भावूक झाले व त्यांच्या डोळ्यातून सहज अश्रूधारा वाहत होत्या.
अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी भेट
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली यांच्यासह आशा भोसले यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी भेट दिली. सचिन यांनी आशाताईंचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आशा भोसले यांचे पूत्र आनंद यांच्यासह कुटुंबियांची भेट घेतली. भोसले कुटुंबियांशी संवाद साधताना सचिन यांना अश्रू अनावर झाले. लता मंगेशकर यांच्यासह आशा भोसले यांच्याशी सचिन यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
सचिन भावूक
आशा भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिल्याचा सचिन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात सचिन भोसले कुटुंबियांशी संवाद साधत आहेत. यावेळी भावूक झालेल्या सचिन यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत आहेत. सचिन यांच्या पत्नी अंजली देखील यावेळी भावूक झाल्या होत्या. सचिन भोसले कुटुंबियांना धीर देतानाही या व्हिडीओत दिसत आहेत.
दिग्गजांची हजेरी
आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. राकेश रोशन, जॅकी श्रॉफ, हेलन, नील नितीश मुकेश आणि त्यांचे वडील, जावेद अली, सुदेश भोसले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशीष शेलार, उद्धव ठाकरे, अरविंद सावंत यांच्यासह अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
सायंकाळी अंत्यसंस्कार
आशा भोसले यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आनंद भोसले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. आशाताईंवर सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे. शनिवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत संसर्ग आणि थकवा जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र, रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
