Asha Bhosle Death News : गेली आठ दशकं आपल्या गाण्यांनी आणि आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज (१२ एप्रिल) जगाचा निरोप घेतला.
आशा भोसले यांना शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं, पण आज त्यांनी अखेरचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आशा भोसले आता आपल्यात नाहीत, पण एकदा त्यांना एका मुलाखतीत, पुन्हा दुसरा जन्म मिळाला तर आशा भोसलेच व्हायला आवडेल का? असं विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्या नेमकं काय म्हणाल्या होत्या? वाचा हा जुना किस्सा…
दुसरा जन्म मिळाला तर पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?
गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल का? यावर त्या म्हणालेल्या, “हो… मला पुढच्या जन्मातही आशा भोसलेच व्हायला आवडेल. या जन्मात माझ्या राहिलेल्या गोष्टी पुढच्या जन्मात मी नक्की पूर्ण करेन. काय माहितीये, शिक्षण… मला शिक्षण कमी मिळालं, त्यामुळे फॉरेनमध्ये माझं गाणं गेलं नाही. मला असं वाटतं की, आपलं गाणं मी फॉरेनला नेलं असतं आणि ते खूप हिट झालं असतं. अशा खूप गोष्टी आहेत, ज्या कराव्याशा वाटतात; त्या सर्व मी माझ्या दुसऱ्या जन्मात जाऊन पूर्ण करेन.”
या उत्तरानंतर आशा भोसले यांनी त्यांच्या लग्नाबद्दलही वक्तव्य केलं होतं. “अशा खूप गोष्टी आहेत, ज्या मी दुसऱ्या जन्मात पूर्ण करेन”, हे म्हटल्यानंतर त्या लगेच, “पण मी लग्न करणार नाही…”, असं म्हणाल्या होत्या. शेवटची ओळ म्हटल्यानंतर आशा भोसले स्वत:च मोठ्याने हसल्या होत्या.
दरम्यान, आशा भोसले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अवयव निकामी झाल्याने आशा भोसलेंची प्राणज्योत मालवली, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार अन् चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
आशा भोसले यांच्यावर उद्या शिवाजी पार्कमध्ये होणार अंत्यसंस्कार
आशा भोसले यांच्या निधनाबद्दल मुलगा आनंद भोसले यांनी माहिती दिली आहे. “आशा भोसले यांचे पार्थिव उद्या सकाळी ११ वाजता, कासा ग्रँड लोअर परळ, त्या जिथे राहायच्या त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ४ वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील”, असं एएनआयशी बोलताना आनंद भोसले म्हणाले.
