आशा भोसले नावाच्या एका युगाचा अंत झाला आहे. एक चिरतरुण आवाज मागच्या आठ दशकांहून अधिक काळ आपल्याला सुखावत होता. तो आवाज आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपाचे नेते आशिष शेलार आणि आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. दरम्यान लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यात सूप्त संघर्ष होता अशी चर्चा कायम रंगली होती. त्याबाबत आशा भोसले यांनी उत्तर दिलं होतं.

आशा भोसले लतादीदींसह असलेल्या संघर्षाच्या प्रश्नावर काय म्हणाल्या होत्या?

संघर्ष काय होता? असं तुम्ही विचारलंत एका झाडाखाली दुसरं झाड उगवत नाही. त्यामुळे झाडाने वेगळं व्हायला पाहिजे. तशी मी वेगळी झाले, भोसले झाले. आमच्या नात्यांमध्ये संघर्ष कधीही आला नाही, पण गाण्यांत संघर्ष आला होता. तो लोकांनी निर्माण केला आहे. लता चांगली की आशा चांगली गाते ते तराजूत ठेवायची. लतादीदीची स्टाईल स्वतःची आहे, माझी वेगळी आहे. मोठ्या झाडाखाली छोटी झाडं वाढत नाही, त्यामुळे झाडानेच ठरवलं पाहिजे की मोठं व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे असं आशा भोसले यांनी म्हटलं होतं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले यांनी हे उत्तर दिलं होतं.

What Asha Bhosle told About Lata Mangeshkar
लता मंगेशकरांबाबत काय मत आशा भोसलेंनी व्यक्त केलं होतं? (फोटो-आशा भोसले, फेसबुक पेज)

सुधीर गाडगीळ यांना दिलेल्या मुलाखतीत लतादीदींबाबत काय म्हणाल्या होत्या आशाताई?

आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोघींनी जेव्हा गाणं गायला सुरुवात केली, तो काळ बऱ्यापैकी सारखा होता. त्यामुळे या दोघींमध्येही स्पर्धा आहे असं बोललं जायचं. अगदी लतादीदी हयात असेपर्यंत या चर्चा रंगायच्या. याबाबत आशा भोसलेंनी २०१८ मध्ये सुधीर गाडगीळ यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. दीदी एक टोक घेऊन गात राहिली. तिची गाणी तिच्या शैलीला साजेशी संस्कारी, निर्मळ, शांत असायची. दुसरं टोक घेऊन मी गात राहिले, माझी गाणी ही माझ्यासारखी अवखळ असायची. त्यामुळे मी कुठलं गाणं गायचं आहे हे काही बंधन ठेवलं नाही. आम्ही दोघींनी एक काळ राज्य केलं आहे, मात्र काळानुरुप आपल्याला बदलावं लागतं हे देखील खरं आहे असंही आशा भोसले या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

मी लतासारखं गाते असं लोक म्हणायचे ते आवडत नव्हतं, काय म्हटलं होतं आशा भोसलेंनी?

“लतादीदी माझी मोठी बहीण होती. त्यातून दीदी सुंदर गायची त्यामुळे मी सुरुवातीला तिची नक्कल करायचे. दीदी जसं गायची तसंच मी गायची. मोठ्या बहिणीची नक्कल करणं हा त्यामागचा स्थायीभाव होता. कुठलंही गाणं दीदीने म्हटली की मी तसंच गाणं त्यावेळी म्हणायची. पण मला हे लक्षात आलं होतं लता मंगेशकर हे नाव इतकं मोठं झालं होतं की तिच्यासारखं गाणं म्हणणाऱ्याला कोण चान्स देणार? लोक म्हणायचे ही (आशाताई) बहिणीसारखं म्हणजेच लतासारखं गाते. लतासारखं गाते असं जेव्हा लोक म्हणायचे ते मला आवडायचं नाही.” असं एका मुलाखतीत आशा भोसले म्हणाल्या होत्या.