भारतीय संगीत विश्वातील दोन नावं ही कायम स्मरणतात राहितील ती म्हणजे लता मंगेशकर आणि आशा भोसले. या दोघी बहीणींनी एक हाती या क्षेत्रावर राज्य केलं आहे. लता दीदी आज आपल्यात नसल्या तरी आशा भोसले या आजही या क्षेत्रात सक्रिय आहेत. पुढील महिन्यात आशा भोसले ह्या त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त दुबईमध्ये एक कॉन्सर्ट करणार आहेत. सध्या त्याचीच प्रचंड चर्चा आहे.

या लाईव्ह शो दरम्यान आशा भोसले त्यांच्या या सांगीतिक प्रवासातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा करणार आहेत. लता मंगेशकर यांची बहीण असल्याने आशा भोसले यांना तुलना होऊ नये यासाठी स्वतःच्या गाण्याच्या शैलीवर मेहनत घ्यायला लावली. तसं केलं नसतं तर कदाचित आशा भोसले यांना कुणीच उभं केलं नसतं असं त्यांनीच नुकतं एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : ‘गदर २’ची पाचव्या दिवशी सर्वाधिक कमाई; लवकरच मोडणार ‘द केरला स्टोरी’चा रेकॉर्ड

‘इ टाईम्स’शी संवाद साधताना आशा भोसले म्हणाल्या, “मी जर तिच्याप्रमाणे गायले असते तर या क्षेत्रात मला कुणीच काम दिलं नसतं.” यामुळेच आशा भोसले यांनी स्वतंत्र शैली तयार केली, वेगवेगळ्या गाण्यांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. आशा भोसले म्हणाल्या की त्यांचा आवाज आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात बराच फरक होता आणि तो फरक केवळ रियाजामुळेच निर्माण झाला.

आशा भोसले यांनी त्यांचा आवाज आणि गायकी अधिक धारदार केली, जर त्या लता मंगेशकर यांच्या आवाजाप्रमाणे मृदु स्वरात गायल्या असत्या तर कालांतराने त्या लोकांच्या विस्मृतीत गेल्या असत्या हि गोष्ट खुद्द आशाजी यांनीच कबूल केली आहे. गेल्या ८ दशकात आशा भोसले यांनी लाखो गाणी गायली आहेत. आजही ९० व्या वर्षीही त्यांचा उत्साह हा तरुण गायक आणि गाईकांना लाजवेल असाच आहे.

Story img Loader