Asha Bhosle Death News : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत क्षेत्रातला ध्रुव तारा निखळल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होते आहे. दरम्यान आशा भोसले यांचे काही व्हिडीओजही व्हायरल होत आहेत. त्यातला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. आशा भोसले यांनी देवाकडे एक इच्छा बोलून दाखवली होती तोच हा व्हिडीओ आहे.
काय म्हणाल्या होत्या आशा भोसले?
माझी एकच इच्छा आहे देवाकडून, मला गाता गाता मरण यावं, बस आणखी काही नाही. एवढ्या एका ओळीचाच हा व्हिडीओ आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात शंकर महादेवन आणि इतर मान्यवरही आहेत. त्यांनाही या हे वाक्य हेलावून गेलं आहे हे दिसून येतं आहे.
माईक हातून सुटू नये, तो सुटला तर माझा जीवही त्यासोबत जावा-आशा भोसले
२०१८ मध्ये सुधीर गाडगीळ यांना दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले म्हणाल्या होत्या की मी माईक हाच माझा परमेश्वर आहे. दहा वर्षांची असल्यापासून मी माईकपुढे आहे आणि अजूनही माईक सोडलेला नाही. माईक सुटू नये हातून, तो सुटणार असेल तर माझा जीव जावा त्यासोबत इतकीच इच्छा आहे. कारण आयुष्यात अनेक दुःखं भोगली आहेत. या दुःखांनो या असं माझं आयुष्य आहे. नदी जेव्हा एखादी निघते तेव्हा ती जशी टकरत जात असते तसंच माझं आयुष्य आहे. घरातून बाहेर पडताना माझा मूड कसाही असला तरीही स्टुडिओत जाताना हसत सगळ्यांना तोंड द्यायचं. लोकांना हसवायचं, आपण हसायचं आणि हसत हसत गायचं. कारण माझी सगळी गाणी हसरी आहेत. असं आशा भोसले यांनी म्हटलं होतं.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार
अशा मनाने सदैव चिरतरुण असलेल्या आशा भोसले यांचं ९२ व्या वर्षी निधन झालं. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून नोंद
सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनीज बुकमध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचं गाणं कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही.
