Asha Bhosle Passes Away: संगीत क्षेत्रातील एक युग संपले आहे. प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज, १२ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना शनिवारी (११ एप्रिल) रात्री थकवा आणि फुफ्फुसांच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे सुपूत्र आनंद भोसले यांनी माहिती दिली आहे.
“मी आनंद भोसले. माझ्या आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालंय. उद्या सकाळी ११ वाजता, कासा ग्रँड लोअर परळ त्या जिथे राहायच्या त्याठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. ज्यांना अंत्यदर्शन करायचे असतील, त्यांनी तिथे यावं. त्यानंतर ४ वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील,” असं एएनआयशी बोलताना आनंद भोसले म्हणाले.
आशा भोसले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अवयव निकामी झाल्याने आशा भोसलेंची प्राणज्योत मालवली, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटी, राजकारणी व चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
आशा भोसलेंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला होता. दिवंगत पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या होत. लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या सर्व भावंडांमध्ये आशा ताई तिसऱ्या क्रमांकाच्या होत्या.
आशा भोसलेंचे वैयक्तिक आयुष्य
आशा ताईंचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. १६ व्या वर्षी त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि १९६० मध्ये त्या पतीपासून वेगळ्या झाल्या. त्यावेळी त्यांना दोन मुलं होती आणि त्या तिसऱ्या बाळाच्या वेळी गरोदर होत्या. १९८० मध्ये आशा भोसलेंनी प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन म्हणजे राहुल देव बर्मन यांच्याशी विवाह केला. या दोघांची जोडी संगीत क्षेत्रातही अत्यंत यशस्वी ठरली. १९९४ मध्ये आर. डी. बर्मन यांच्या निधनापर्यंत ते एकत्र होते.
आशा भोसलेंचे गायन करिअर
आशा ताईंनी वयाच्या १० व्या वर्षी, १९४३ मध्ये ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटासाठी ‘चला चला नव बाळ’ हे पहिले गाणे गायले होते. १९४८ मध्ये ‘चुनरिया’ या चित्रपटातील ‘सावन आया’ या गाण्याद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. सुरुवातीच्या काळात त्यांना मुख्यत्वे ज्या गाण्यांना इतर गायिका नकार द्यायच्या, अशी गाणी मिळत असत. संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी आशा ताईंच्या आवाजातील वेगळेपण ओळखले. ‘नया दौर’ (१९५७) सारख्या चित्रपटांमुळे त्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. १९७० च्या दशकात आर. डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘चुरा लिया है’ सारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. नी मराठी आणि हिंदीसह २० हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी १२,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली असून, त्यांच्या नावावर सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंगचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील नोंदवला गेला होता.
