आशा भोसले नावाचा चंद्र संगीत क्षेत्राच्या अवकाशातून मावळला आहे. रविवारी म्हणजेच १२ एप्रिलला त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा मुंबईतल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातला अढळ तारा निखळला आहे, यात शंकाच नाही. त्यांच्या आवाजाचं गारुड ऐंशी वर्षांहून अधिक काळ होतं. त्यांनी वैजयंतीमाला, मधुबाला यांच्यापासून परवीन बाबी, रेखा, काजोल, तब्बू यांना त्यांचा आवाज दिला आहे. आशा भोसले या कायम एव्हरग्रीन राहिल्या. हेलनचा कॅब्रे असो किंवा रेखाने उमराव जानमध्ये सादर केलेली गझल आशा भोसले यांचा प्रवास हा खळखळत्या झऱ्यासारखा होता. आपण जाणून घेऊ प्रत्येक पिढीत त्यांचा आवाज कसा हिट ठरला.
आशा भोसले यांची ८१ वर्षांची साधना
आशा भोसले यांनी आठ दशकं संगीत क्षेत्रावर राज्य केलं. लता मंगेशकर यांची सख्खी बहीण म्हणजे आशा भोसले. या दोघींमध्येही स्पर्धा होतीच. आशाताईंनीच सांगितलं होतं सुरुवातीच्या काळात माझा आणि लतादीदीचा आवाज सारखा होता. त्यावेळी मला कुणी म्हणालं की ही तर लतासारखं गाते तर मला राग येई, मी तिथेच ठरवलं की आपली वेगळी ओळख तयार करायची. आशा भोसले यांनी घेतलेला हा निर्णय त्यांचं वेगळेपण ठसवणारा आणि वेगळी छाप पाडणारा ठरला. आवाजाचं बहुढंगीपण काय असतं ते आशा भोसलेंनी दाखवून दिलं. मधुबाला, वैजयंतीमाला, रेखा यांच्यासह आत्ताच्याही अनेक अभिनेत्रींचा ‘आवाज’ आशाताई झाल्या.
“अरे ही तर लतासारखी गाते असं कुणी म्हटलं तर मला आवडत नसे. मी त्यावेळी ठरवलं की आपली वेगळी ओळख निर्माण करायची. त्यामुळे मी तशी आवाजाची पद्धत बदलली.”
-आशा भोसले (२०१८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीतलं वक्तव्य)
मधुबाला, वैजयंतीमाला यांच्यासाठीही पार्श्वगायन
मधुबाला यांच्यावर चित्रित झालेलं ‘आईये मेहरबाँ’ आठवा किंवा ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’..हे गाणं आठवून पाहा. त्यात मधुबाला यांचा जसा अवखळपणा दिसला तो अगदी त्यांचाच आवाज वाटावा असाच आशाताईंच्या आवाजातही आला. त्यामुळे ही गाणी वेगळी ठरली. वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेलं ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ हे गाणं आठवा. दिलीप कुमार यांना मोहम्मद रफींचा आवाज आणि वैजयंतीमालांना आशाताईंचा. आशाताईच गात आहेत असं वाटून जातं. कुठल्या अभिनेत्रीसाठी गातोय हे विचारांत घेऊन आशा भोसलेंनी त्यांची खास स्टाईल निर्माण केली.

आशाताई हेलन यांचाही आवाज झाल्या
१९६० ते १९८० च्या कालावधीत जे चित्रपट येत असत त्यात हेलन हे नाव ठरलेलं असे. कॅब्रे डान्सरची भूमिका असो किंवा इतर कुठलीही भूमिका हेलनचा एक नाच आणि ते गाणं आशा भोसलेंच्या आवाजात हे ठरलं की आपलं पिक्चर हिट होणार हे त्या काळी निर्मात्यांचं गणितच ठरलं होतं जणू. त्यामुळेच आशा भोसले हेलन यांचा आवाज झाल्या. डॉन चित्रपटातलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ आठवा, ‘पिया तू अब तो आजा’ आठवा, ‘मेरा नाम चिन चिन चू; आठवा किंवा अगदी तिसरी मंजिलमधलं ‘ओ हसीना जुल्फो वाली जाने जहाँ’ आठवा. सगळी गाणी आपण अगदी सहज गुणगुणू शकतो. याचं कारण आशाताईंनी त्यांच्या आवाजाला दिलेली तशी ट्रिटमेंट. परवीन बाबी यांच्यावर चित्रित झालेली ‘जवानी जानेमन’ आणि ‘रात बाकी बात बाकी’ या गाण्यांची गोडीही अशीच अवीट ठरली यात शंका नाही. झीनत अमानसाठी गायलेलं ‘दम मारो दम’ हे तर हिप्पी स्पेशल गाणं म्हणून आजही ओळखलं जातं. तसंच यादो की बारातमधलं ‘चुरा लिया है जो तुमने दिल को..’ हे गाणं तर कैक पिढ्यांचं प्रेमगीत ठरलं.

आशा पारेख आणि साधना यांच्यावर चित्रित झालेली गाणीही स्मरणात
जी गोष्ट हेलन यांची तशीच आशा पारेख किंवा साधना यांचीही आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं ‘ओ मेरे सोना रे सोना’ असो किंवा ‘जाईये आप कहा जाएंगे’ असो किंवा ‘परदे में रहने दो, परदा ना उठाओ’ ही गाणी आशाताईंनी अजरामर केली आहेत. तसंच साधना यांच्यावर चित्रित झालेलं ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं’ असो किंवा मेरा साया मधलं ‘झुमका गिरा रे’ असो आशा भोसलेंनी त्या गाण्यांना एक वेगळी उंची दिली यात शंका नाही. त्यांचा आवाज व्हर्सटाईल होताच एकीकडे वेस्टर्न, क्लासिकल, भजन, हिंदी चित्रपटातील प्रेमगीतं, कॅबरेमधली गाणी आशाताई गात होत्या. शर्मिला टागोर आणि शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं ‘दिवाना हुआ बादल’ही सुख काय असतं ते सांगणारं गाणं अजूनही ठरतं. तसंच त्यांनी गझल या प्रकारातही मुक्त वावर केला.
रेखा यांच्या उमराव जान मधली सगळी गाणी हिट
रेखा यांचा उमराव जान आला आणि गझल प्रकारतली आशाताईंच्या आवाजातली जादू सगळ्यांनी अनुभवली. ‘जुस्तजू जिसकी थी’, ‘इन आँखो की मस्ती’ के किंवा ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिये’ म्हणत आशा भोसलेंनी जी कमाल केली त्यामुळे खरंच त्या पिढीने त्यांना आपलं काळीजच देऊन टाकलं असं म्हटलं तर अतिशोयोक्ती ठरणार नाही. गुलजार यांचा इजाजत आला आणि ‘कतरा कतरा मिलती है’, ‘छोटीसी कहानी है’, ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ या गाण्यांचा जन्म झाला. या गाण्यांनी पुन्हा एकदा आशाताईंच्या आवाजाची नवी ओळख आपल्याला करुन दिली.

नव्या पिढीतल्या नायिकांचाही आवाज झाल्या आशाताई
रंगीला चित्रपट आला उर्मिला मातोंडकरवर चित्रित झालेलं ‘रंगीला रे’, तसंच ‘तनहा तनहा’ हे गाणं जादू करुन गेलं. या गाण्यांसाठी आशाताईंनी लावलेला सूर खासच होता असंच म्हणता येईल. ए. आर. रहमानचं संगीत आणि आशाताईंचा आवाज म्हणजे पर्वणीच ठरली. सत्या चित्रपटातलं ‘सपने में मिलती है’ हे गाणंही तसंच. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधलं ‘जरासा झुम लूँ मै’ या आशाताईंच्या गाण्याने काजोललाच नाही ते गाणं पाहणाऱ्या सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने नाचवलं. तर पुढे दिल तो पागल है चित्रपटातल्या करीश्मा कपूरवर चित्रित झालेल्या ‘ले गयी ले गयी’ गाण्यानेही थिरकायला लावलं. तक्षक चित्रपटातलं ‘मुझे रंग दे मुझे रंग दे’ हे गाणंही तसंच. लगान सिनेमातलं ‘राधा कैसे ना जले’ हे गाणं असू द्या किंवा ताल चित्रपटातलं ऐश्वर्या रायवर चित्रित झालेलं टकहीं आग लगे लग जायेट असो सगळी गाणी आशाताईंनी गायली आहेत आणि आपल्याला ऐंशी वर्षे मंत्रमुग्ध केलं आहे, नाचायला लावलं आहे, अंतर्मुख केलं आहे. आशाताई यांची ही सगळी गाणी आपल्या सोबत कायम राहणार आहेत. शिवाय मधुबाला ते करीना कपूर नायिका बदलल्या तरीही आशा भोसलेंचा आवाज कायम राहिला.

इंडीपॉपच्या अनभिषिक्त सम्राज्ञी ठरल्या आशा भोसले
इंडीपॉपच्या अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून कुणाचं नाव घ्यायचं असेल तर ते नाव फक्त आशा भोसले आहे. कारण त्यांचं गाणं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलं आहे, कैक पिढ्या जोडत आलं आहे. इंडी पॉप प्रकार आला तेव्हा त्यांनी त्यांच्यातल्या गायिकेला काही सीमा नसतात हे दाखवून दिलं. ‘जानम समझा करो’ हा त्यांचा अल्बम १९९७मध्ये आला. लेस्ली लुईससह त्यांनी हा अल्बम आणला होता इंडिपॉपमधला गेमचेंजर म्हणून या अल्बमकडे पाहिलं जातं. ‘आशा अँड फ्रेंड्स’ या अल्बममधून त्यांनी नव्या कलाकारांसह कोलॅब केलं. ‘यू हॅव स्टोलन माय हार्ट’ हा क्रोनोस क्वार्टेटसह केलेला त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट होता. गाण्याचा प्रत्येक प्रकार त्यांनी हाताळला. १२ हजारांहून अधिक गाणी गायली. त्यांचा आवाज लाभल्याने ही गाणी धन्य झाली आहेत असं म्हटलं तर त्यात शंका नाही.
