Asha Bhosle’s Last Days Memories : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं काही दिवसांपूर्वी दु:खद निधन झालं. आशा भोसलेंच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.  अशातच आता त्यांचा नातू चिंटू भोसलेनेसुद्धा त्यांच्याबरोबरच्या भावुक आठवणी सांगितल्या आहे. 

आशा भोसले यांच्या निधनाच्या अवघ्या ३-४ दिवस आधी घरातील सदस्यांबरोबर त्या संध्याकाळी  नेहमीप्रमाणे  एकत्र बसल्या होत्या. आंबे खात खात इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाबद्दल चर्चा सुरू होती अशी आठवण त्यांच्या नातवाने सांगितली आहे.

निधनाच्या आदल्या दिवशी पाहिलं मराठी नाटक

आशा भोसले यांचं १२ एप्रिल २०२६ रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांना एक दिवस आधी अतिशय थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली.  ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना त्यांचा नातू त्यांच्या अखेरच्या दिवसांबद्दल बोलताना म्हणाला, “निधनाच्या आदल्या दिवशी त्या तीन तासांचं मराठी नाटक पाहायला गेल्या होत्या. त्या रंगमंचावरही गेल्या आणि कला जिवंत ठेवण्यासाठी तिथल्या लोकांना सुनावलंसुद्धा. शेवटपर्यंत त्या अशाच होत्या.”

चिंटू भोसले आजीबद्दल म्हणाला, “आशा भोसले यांचं निधन अतिशय शांतपणे आणि झोपेतच झालं. त्यांनी अत्यंत शांत अवस्थेत या जगाचा निरोप घेतला. रुग्णालयात येऊ का, असं विचारल्यावर त्यांनी मला, मला थोडा वेळ झोपू दे असं सांगितलं होतं. जसं त्यांनी आयुष्य स्वतःच्या अटींवर जगलं, तसंच त्या स्वतःच्या इच्छेने या जगातून निघून गेल्या” असंही चिंटूने सांगितलं.

अशा भोसले व त्यांची नात जनाई भोसल यांचं खूप घट्ट नातं होतं. त्यामुळे आजीच्या निधनानंतर जनाईवर दु:खाचा डोंगर कोसळा. आशा यांच्या निधनानंतर जनाई भोसले खूप खचली असल्याचंही चिंटू भोसलने सांगितलं आहे.  आशा भोसले यांनी जनाईच्या गायन प्रवासात आणि तिच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. लहानपणापासून दोघी एकत्र सादरीकरण करत होत्या, असंही त्याने सांगितलं. कुटुंबातील सर्वजण या दुःखामुळे हादरले आहेत. पुढे कसं जायचं, असा प्रश्न काही काळ पडला होता. मात्र आता आशा भोसले यांच्याकडूनच प्रेरणा आणि ताकद घेत आहोत, असं चिंटूने म्हटलं.

चिंटू भोसले आशा यांच्याबद्दल पुढे म्हणाला, “त्यांनी दोन मुलांना गमावलं आणि एखाद्या व्यक्तीसाठी यापेक्षा मोठं दुःख असू शकत नाही. पण त्यांनी खंबीरपणे आणि धैर्याने त्या दुःखावर मात केली. त्या नेहमी म्हणायच्या, परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. वाईट गोष्टी घडतात, पण काळ सगळ्या जखमा भरून काढतो. आम्ही सगळे त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो आणि विचार करतो की त्यांनी इतक्या मोठ्या दुःखाचा सामना कसा केला. जर यातून आम्हाला प्रेरणा मिळाली नाही, तर मग आणखी कशातून मिळणार?”