scorecardresearch

“मला मंत्री व्हायचं आहे कारण…” अशनीर ग्रोव्हरचा राजकारणात येण्याबद्दल मोठा खुलासा

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचं उदाहरण देत अशनीर यांनी सांगितली त्यांच्या मनातील सुप्त इच्छा

“मला मंत्री व्हायचं आहे कारण…” अशनीर ग्रोव्हरचा राजकारणात येण्याबद्दल मोठा खुलासा
फोटो : व्हिडिओतून स्क्रीनशॉट

Ashneer grover on TRS show : सध्याच्या तरुण उद्योजकांसमोर अशनीर ग्रोव्हर ही व्यक्ती एक मूर्तिमंत उदाहरण आहे. उद्योग क्षेत्रात अशनीर यांनी केलेली प्रगती खूप कौतुकास्पद आहे. ‘शार्क टँक इंडिया’ या शोमुळे हे नाव घराघरात पोहोचलं आणि हा शो न पाहणाऱ्या लोकांनासुद्धा अशनीरच्या डायलॉगचे मीम्स आवडू लागले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर नसल्याने बरेच चाहते नाराज झाले. नुकतंच अशनीर यांनी एका मुलाखतीमध्ये त्याच्या या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे.

अशनीर यांनी नुकतंच ‘द रणवीर शो’ या हिंदी पॉडकास्टच्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलासा केला. शिवाय ‘शार्क टँक इंडिया’च्या नवीन सीझनबद्दलही बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. याच मुलाखतीमध्ये अशनीर ग्रोव्हर यांना त्यांच्या भविष्याबद्दल आणि पुढील ध्येयाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

आणखी वाचा : ‘गोरखा’ चित्रपटातून अक्षय कुमार पडणार बाहेर; ‘हे’ असू शकतं यामागील कारण

पुढच्या येणाऱ्या काळात मला राजकारणात शिरून मंत्री व्हायचं आहे असं उत्तर अशनीर यांनी दिलं. याविषयी बोलताना अशनीर म्हणाले, “मला बरंच काही करायचं आहे, एकदिवस मला या देशाचा मंत्री व्हायचं आहे. माझ्याकडे यासाठीचं ठोस नियोजन नाहीये, पण मनात ही सुप्त इच्छा आहे. अगदीच राजकारणात प्रवेश करण्याचा माझा निर्णय नाही, पण राष्ट्रनिर्मितीच्या बाबतीत ज्या क्षेत्रात जास्त प्रभावशाली काम करता येईल त्या क्षेत्रात जायला नक्कीच आवडेल. जेव्हा तुम्ही कंपनी सुरू करता तेव्हा तुमच्या कर्माचाऱ्यांवर तुमचा प्रभाव असतो, जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी बनता तेव्हा तुम्हाला फॉलो करणारी लोक प्रभावित होतात आणि जर तुम्हाला संपूर्ण देशावर प्रभाव पाडायचा असेल तर राजकारणाशिवाय दूसरा मार्ग मला तरी माहीत नाही.”

राजकारणात प्रवेश करताना भीती वाटत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाला, “माझं आयुष्य मला या पुढच्या वाटचालीसाठी तयार करतंय असं मला वाटतं, त्यामुळे मला भीती नाही वाटत, आणि पुढच्या ४ ते ५ वर्षात माझी त्या दिशेने वाटचाल सुरू झाली असेल हे मात्र नक्की.” पुढे वयावरून होणाऱ्या टिकेबद्दल अशनीर यांनी हसत हसत ऋषि सुनक यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “ऋषि सुनक हे ४२ व्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर लोक त्यांचं कौतुक करतात, मी ४० वर्षांचा आहे, मी जर ४५ वर्षापर्यंतसुद्धा तिथपर्यंत पोहोचलो तरी लोकांना त्यावरून आक्षेप आहे. हा दुटप्पीपणा आहे ना.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 13:16 IST

संबंधित बातम्या