Ashok Saraf & Nivedita Saraf Emotional Pos About Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज (१२ एप्रिल) रोजी निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातून दु:ख व्यक्त केले जात आहे. तसेच संगीत विश्वातील अनेक गायक अन् संगीतकारांनीसुद्धा आशा भोसले यांच्या निधनानंतर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही आशा भोसले यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशोक सराफ यांनी आशा भोसलेंच्या आठवणीत “आज आकाशाने त्याचा एक तारा परत घेतला… आशाताई, तुमचं अस्तित्व कायम आमच्या श्वासात असेल…”, अशा शब्दांत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
तसेच अभिनेत्री निवेदिता यांनीही भावुक पोस्ट शेअर केली आहे. “एक रत्न आज हरपलं… आशाताई, तुमच्या आठवणी सदैव जिवंत राहतील. तुम्ही आमच्या मनात कायम असाल…”, अशी भावुक पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी शेअर केलेल्या पोस्टखालील कमेंट्समध्ये चाहत्यांनीसुद्धा आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सलील कुलकर्णी, सुकन्या मोने, श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, अमृता खानविलकर, सचिन पिळगांवकर, रितेश देशमुख, हेमंत ढोमे, सुबोध भावे, कमल हासन, श्रद्धा कपूर यांसह अनेकांनी आशा भोसलेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गायक आणि कलाकार मंडळींसह राजकीय नेत्यांनाही आशा भोसलेंच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
दरम्यान, आशा भोसले यांचे पार्थिव कासा ग्रँड लोअर परळ येथील निवासस्थानी नेण्यात आले आहे. उद्या (१३ एप्रिल) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर दादरमधील शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवासस्थानी जाऊन आशा भोसले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील कलाकारदेखील त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत.
आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय गाणी गाणी गायली आहेत. यात मराठी आणि हिंदी गाण्यांसह इतर भाषेतल्या गाण्यांचाही समावेश आहे. आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्या त्यांच्या गाण्यांमुळे कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील.
