Ashwini Kalsekar Shares Husband’s Video : अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांनी मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात विविध मालिका व सिनेमांमध्ये काम करीत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. विनोदी भूमिका असो किंवा खलनायिकेची भूमिका असो, अभिनेत्रीने नेहमीच तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या अश्विनी सोशल मीडियावरसुद्धा तितक्याच सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच पती मुरली शर्मा यांच्याबरोबरचे अनेक व्हिडीओसुद्धा शेअर करत असतात. अशातच त्यांनी मुरली शर्मा यांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
मुरली शर्मा यांनी गायले ‘हे’ मराठी गाणे
अश्विनी काळसेकर मराठी आहेत आणि मुरली शर्मा हे अमराठी आहेत. पण पत्नीसाठी त्यांनी एक नुकतेच मराठी गाणे गायले आहे. अश्विनी यांनी पतीकडे मराठीत गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली आणि मुरली यांनीसुद्धा पत्नीची ही इच्छा पूर्ण केली आहे. मुरली यांनी ‘देवा तुझ्या घराला’ हे ‘दुनियादारी’ चित्रपटातील गाजलेले मराठी गाणे गायले. या गाण्याचा व्हिडीओ अश्विनी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये अश्विनी म्हणतात, “माझ्या सगळ्या मराठी बंधू-भगिनी, काका-काकी, मामा-मामी सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी मुरलीला मी विनंती केली की, मराठी गाणे गा”. मग मुरली म्हणाले, “ठीक आहे, दोन ओळी गातो.” पुढे त्यांनी मुरली यांचा गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गाण्याचे अचूक मराठी शब्द आणि त्यांचे गाणे गातानाचे भाव पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
चाहतेच नव्हे, तर अनेक मराठी कलाकारांनीसुद्धा मुरली यांच्या मराठी गाण्याचे कौतुक केले आहे. सुमित राघवनने व्हिडीओवर कमेंट करीत कौतुक केले आहे. तर स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरनेसुद्धा कमेंट केली आहे. तसेच अश्विनी-मुरली यांच्या चाहत्यांनीसुद्धा या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये गाण्याचे कौतुक केले आहे.
अश्विनी काळसेकरांनी शेअर केलेला व्हिडीओ
दरम्यान, ‘कसम से’ किंवा ‘जोधा अकबर’मध्ये अश्विनींनी साकारलेल्या खलनायिका असो किंवा ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न’, ‘सर्कस’ या रोहित शेट्टीच्या सिनेमातील विनोदी भूमिका असो, अश्विनी यांचे प्रत्येक काम लक्षात राहण्यासारखे आहे. त्यांनी मराठीतही काम केले असून, ‘फू बाई फू’मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेतही होती.
२००९ साली अश्विनी आणि मुरली यांनी लग्नगाठ बांधली. मुरली तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असून त्यांची भेट ‘अपहरण’च्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवरच त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मग त्यांनी लग्न केले.
