गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर कलाविश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला. विजू मामा यांच्या जाण्याने रंगभूमी पोरकी झाली अशा शब्दांत काहींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावरच संताप व्यक्त करत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. रंगभूमीवरील प्रत्येक व्यक्ती तुमचा मामा किंवा मावशी कशी होते असा सवाल त्यांनी केला. कुंडलकर यांच्या फेसबुक पोस्टचा दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव आणि प्रदीप पटवर्धन यांनी खरपूस समाचार घेतला. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात तिघांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेल्या मकरंद अनासपुरेनं हा विषय काढला.

इंडस्ट्रीतल्या जवळच्या व्यक्तींना मामा किंवा काका म्हणतो, पण काही जणांना यावर आक्षेप आहे, यावर तुमचं काय मत आहे असा प्रश्न मकरंदनं विचारला. त्यावर भरत म्हणाला, ‘हा संस्काराचा भाग असतो. मराठी इंडस्ट्रीतली येणारी पिढी ही नाती जपणारी आहे. त्याला आपण संस्कार म्हणतो. सेटवर आपण एक कुटुंब म्हणून काम करतो. म्हणून मामा किंवा काका म्हणणं स्वाभाविक आहे.’

Video : तनुश्रीच्या कारवरील हल्ल्याचा २००८ मधला व्हिडिओ व्हायरल

दिग्दर्शक केदार शिंदेंनीही यावर त्यांचं मत मांडलं. ‘पट्या दादा किंवा पाटकर दादा हे शब्द बोलताना मनापासून निघतात. कोणीही सांगितलेलं नसतं. पण शेवटी आपण या गोष्टीकडे कसं पाहतो त्याचा भाग आहे. मला झोपेतून उठवून जरी कोणी विचारलं तरी विजू मामा असंच नाव येणार. बाकी हा सगळा ‘इंटलेक्च्युअल’ नावाचा खेळखंडोबा आहे,’ असा उपरोधिक टोला त्यांनी कुंडलकर यांना लगावला. या कार्यक्रमात विजू मामांच्या आठवणी सांगताना अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे डोळे पाणावले.

आपल्या लाडक्या कलाकाराविषयी किंवा नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांनाच असते. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कशी आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा होता, कसे ते या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात. या नावाजलेल्या व्यक्तींची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमातून पाहायला मिळतात.