गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु आहे. राजकुमार राव-पत्रलेखापाठोपाठ आता विकी कौशल आणि कतरिना कैफ विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यानंतर आता येत्या काही दिवसात अभिनेता सुनील शेट्टीच्याही घरी लवकरच सनईचौघडे वाजणार असल्याचे बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटपटू के एल राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली आहे.

तडप या चित्रपटाचा भव्य प्रीमियर शो काल बुधवारी १ डिसेंबरला मुंबईत पार पडला. अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आणि अथियाचा भाऊ अहान शेट्टी ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या प्रीमियर शो ला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. मात्र या कलाकारांमध्येही के.एल. राहुलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अथिया शेट्टीने केएल राहुलसोबत एकत्र एंट्री मारत या प्रीमियर शोला हजेरी लावली. यावेळी त्या दोघांनीही कॅमेऱ्याकडे बघून एकत्र पोझ दिली. यावेळी त्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. यावेळी अथियाने राहुलाचा हात पकडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या दोघांनी एकत्र मीडियासमोर हजेरी लावली. त्यामुळे याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

या संपूर्ण कार्यक्रमातील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे केएल राहुलने फक्त अथियासोबत नाही तर संपूर्ण शेट्टी कुटुंबासोबतही फोटो काढला. त्यावेळी या ठिकाणी अहानची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफही तिथे उपस्थित होती.

अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे.