Malavika Mohanan memory with Trisha Krishnan : अभिनेत्री मालविका मोहनन हिने ज्येष्ठ अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दलची एक खास आठवण शेअर केली आहे. ‘पेट्टा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्रिशाने दाखवलेल्या आपुलकीचे मालविकाला आजही कौतुक वाटते. चित्रपटसृष्टीत बहुतेक कलाकार स्वतःचाच विचार करतात. अशा परिस्थितीत त्रिशाचं हे वागणं अत्यंत दुर्मिळ आणि मन जिंकणारं होतं, असं मालविका सांगते.

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित ‘पेट्टा’ या चित्रपटातून मालविकाने तमिळ चित्रपटांत पदार्पण केले होते. वाराणसीजवळ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. मालविका पूर्णपणे नवखी होती. तिथे तिचे काही दिवसांचे शूटिंग होते. त्यात त्रिशाबरोबर काही सीन होते. “पेट्टामध्ये माझी भूमिका लहान होती. मी काही दिवस शूटिंग केलं आणि त्रिशाबरोबर माझे काही सीन्स होते. त्यावेळी मी पूर्णपणे नवखी होते. हा माझा पहिला तमिळ चित्रपट होता. मी ‘बियाँड द क्लाउड्स’सारखे काही चित्रपट केले होते, पण कोणताही मोठा किंवा कमर्शियल चित्रपट केला नव्हता,” असं मालविकाने ‘एसएस म्युझिक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

त्रिशा माझ्याशी खूप छान वागली – मालविका मोहनन

त्रिशा तिच्याशी इतकी प्रेमाने वागेल असं मालविकाला अजिबात वाटलं नव्हतं. त्रिशा २०१९ पर्यंत तब्बल दोन दशकांपासून तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने स्वतःच्याच कोशात राहून फक्त तिचं शूटिंग करणं सहज शक्य होतं, पण ती त्याउलट वागली. “त्रिशा माझ्याशी खूप छान वागली. तिने मला खूप कम्फर्टेबल केलं. ती खूप प्लॅन्स करायची, गप्पा मारायची आणि मला प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घ्यायची,” असं मालविका म्हणाली.

मालविकाला फिरायला न्यायची त्रिशा कृष्णन

“आम्ही वाराणसीबाहेर शूटिंग करत होतो आणि एकाच हॉटेलमध्ये राहिलो होतो. ती बाहेर जाण्याचे प्लॅन करायची, एकत्र वेळ घालवायची आणि मी त्या प्लॅनमध्ये आहे, याची खात्री करून घ्यायची. ती जे काही करायची ते मनापासून करायची,” असं मालविकाने सांगितलं. त्रिशाचं वागणं मालविकाच्या मनाला स्पर्शून गेलं. एका मोठ्या कलाकाराने असं वागणं दुर्मिळ आहे. कारण, इंडस्ट्रीत वरिष्ठता आणि दर्जा यावरच सेटवर कोण कोणाशी बोलेल हे ठरतं. “तिने जे केलं ते खूप दुर्मिळ होतं. बहुतेक लोक स्वतःपुरते मर्यादित राहतात आणि विचार करतात, ‘मी सर्वांशी चांगला का वागू?’ पण ती खरोखरच खूप मनमिळाऊ आणि काळजी घेणारी होती,” असं मालविका म्हणाली.

मालविकाला विजयबरोबर चित्रपट मिळाल्यावर त्रिशाने काय केलं?

‘पेट्टा’च्या शूटिंगनंतरही त्रिशा मालविकाच्या संपर्कात राहिली. काही महिन्यांनंतर, मालविका विजयबरोबर ‘मास्टर’ चित्रपटात काम करत होती. तेव्हा त्रिशाने स्वतःहून मेसेज करून तिचं अभिनंदन केलं होतं. मालविका आठवण सांगत म्हणाली, “काही महिन्यांनंतर जेव्हा मी ‘मास्टर’ साइन केला, तेव्हा तिने मला मेसेज केला, ‘मला तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. ही खूप मोठी संधी आहे. अभिनंदन!’ असं करण्यासाठी मोठं मन असावं लागतं.”

दरम्यान, जानेवारी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मास्टर’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने मालविकाच्या करिअरला मोठी कलाटणी दिली. मालविकाने दुलकर सलमानबरोबर ‘पट्टम पोल’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केलं होतं. मग तिने मल्याळम, तमिळ, हिंदी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. अलीकडे ती ‘हृदयपूर्वम्’, ‘द राजा साब’ आणि ‘सरदार २’ मध्ये झळकली.