दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर (डीडी नॅशनल)  पाच नव्या मालिकांची सुरुवात करून वाहिनीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील वीरांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘स्वराज’ या महामालिकेबरोबरच संगीतावर आधारित रिअ‍ॅलिटी कार्यक्रम, स्टार्ट अप्सवर आधारित नव्या मालिकांचा यात समावेश असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स-शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर सध्याच्या काळात महत्त्वाच्या ठरलेल्या स्टार्ट अप्ससारख्या नव्या विषयांबरोबरच महिला सक्षमीकरण आणि देशभक्ती या दोन विषयांवर आधारित नव्या मालिका लवकरच प्रसारित करण्यात येणार आहेत. या नव्या मालिकांच्या माध्यमातून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याची माहिती स्मिता वत्स-शर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनाम वीरांची शौर्यगाथा सांगणारी ‘स्वराज : भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही ७५ भागांची मालिका १४ ऑगस्टपासून दर रविवारी रात्री ९ ते १० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. वास्को द गामाचे भारतात आगमन झाले त्या कालखंडातील इतिहासापासून सुरुवात करत भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे आणि त्या त्या काळातील वीरांची शौर्यगाथा या मालिकेतून पाहता येईल. ही मालिका हिंदीसह मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली, ओडिया आणि आसामी या प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांवरही २० ऑगस्टपासून दाखवण्यात येणार असून मालिकेच्या श्राव्य आवृत्तीचे प्रसारण आकाशवाणी केंद्राच्या वाहिन्यांवरून दर शनिवारी सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती वत्स-शर्मा यांनी दिली.

 त्याचबरोबर ‘जय भारती’, ‘कॉर्पोरेट सरपंच’ आणि ‘ये दिल मांगे मोअर’ या तीन नवीन मालिकांचे प्रसारण १५ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार दररोज करण्यात येईल. दैनंदिन मालिकांशिवाय ‘सूरों का एकलव्य’ हा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना आदरांजली अर्पण करणारी एक मालिका असे दोन संगीतावर आधारित कार्यक्रम १४ ऑगस्टपासून शनिवार आणि रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित करण्यात येतील. याशिवाय, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ४६ स्टार्ट अप्स उद्योजकांच्या यशस्वी प्रवासाची माहिती देणारा ‘स्टार्ट अप चॅम्पियन्स २.०’ हा कार्यक्रम डीडी न्यूज वाहिनीवर शनिवारी रात्री ९ वाजता आणि डीडी नॅशनलवर रविवारी दुपारी १२ वाजता दाखवण्यात येणार आहे.