हिंदी चित्रपटांमधील स्वतंत्र चित्रपटांचा प्रवाह भारतीय माणसांच्या मनातील द्वंद्व प्रभावीपणे टिपण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘मसान’ हा चित्रपट अशाच अस्सल भारतीय माणसांवरील संस्कार, संस्कृती, समाज आणि रूढी-परंपरा यांच्या जोखडातून मुक्त होऊ पाहणाऱ्या तरुण मनांचा हुंकार आहे. एकीकडे इंटरनेटमुळे खुले झालेल्या जगाचे आकर्षण आणि दुसरीकडे जाती, धर्म, पंथांच्या रूढी-परंपरांचे जोखड यात होणारी दोन तरुण जिवांची तगमग, प्रेम, परिस्थितीशी सामना करण्याची असोशी अशा भावभावनांवर प्रकाशझोत टाकत मानसिक द्वंद्वांची कहाणी ‘मसान’ हा चित्रपट प्रभावीपणे मांडतो. यातील सर्वच कलावंतांनी सहजाभिनयाचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे चित्रपटाचा विषय-आशय प्रेक्षकाला थेट भिडतो. गंगा नदीच्या किनारी वसलेल्या बनारसचे धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतानाच आजच्या काळातील बनारसच्या घाटांजवळच्या गावात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य अशी मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. ‘मसान’ चित्रपटात दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे देवी या तरुणीची आणि दुसरी गोष्ट आहे दीपक चौधरी या तरुणाची. देवी ही तरुणी आपल्या वडिलांसोबत बनारसमधील घाटांच्या जवळच्या गावात राहतेय. शिक्षण पूर्ण करून नजीकच्या निमशहरात ती संगणक शिक्षण देणाऱ्या क्लासमध्ये नोकरी करतेय. तिचे वडील बनारस घाटांवर किरकोळ वस्तूविक्रीचे दुकान चालवितात. शिकलेले असूनही उतारवयात उदरनिर्वाहासाठी आणि देवीच्या लग्नासाठी पै पै जोडता यावी म्हणून ते दुकान चालवितात. देवी शिकलेली आहे, इंटरनेटद्वारे जगाशी जोडली गेलेली आहे. धार्मिक-संस्कृती-परंपरेचे जोखड तिला काही प्रमाणात मान्य असले तरी तिच्या स्वत:च्या काही धारणा आहेत. शिक्षणामुळे प्रगल्भता आली आहे. मुक्त विचारांकडे ती झेपावू पाहतेय. स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला जगायचे आहे. जगण्याचा संघर्ष करीत असतानाच एका मोहाच्या क्षणी ती आणि तिचा प्रियकर यांना पोलीस पकडतात. पोलिसांच्या भीतीने देवीचा प्रियकर पीयूष तिथेच आत्महत्या करतो. पोलीस देवी आणि तिच्या वडिलांना ब्लॅकमेल करतात. या सगळ्यामुळे उद्विग्न झालेले देवी, देवीचे वडील यांचा संघर्ष चित्रपट प्रभावीपणे मांडतो. दुसऱ्या गोष्टीत दीपक चौधरी हा तरुण डोम समाजाचे प्रतिनिधित्व करतो. बनारसच्या घाटांवर केल्या जाणाऱ्या मर्तिकांवरील अंत्यसंस्कारांमध्ये प्रेत चांगल्या रीतीने जळावे यासाठी लाकडे गोळा करून आणणे, चिता रचणे, प्रेत वाहून नेणे असे सगळे काम करणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व दीपक हा तरुण करतोय. या सगळ्या परंपरागत कामात त्याने अडकू नये, शिक्षण घेऊन मोठे व्हावे, नोकरी करावी असे त्याच्या वडिलांना वाटत असते. दीपक सिव्हिल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांत शिकतोय. त्यालाही हे परंपरागत काम करणे नकोच आहे. अशातच त्याचे शालू गुप्ता या उच्च जातीतील मुलीवर प्रेम जडते. शालू-दीपक या दोघांनाही वस्तुस्थितीची चांगलीच जाणीव आहे. आपल्या घरातून आपल्या विवाहास कधीच मान्यता मिळणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर दीपकने नोकरी करावी म्हणजे पळून जाऊन लग्न करता येईल असे शालू-दीपक ठरवितात. बद्रिनाथ-केदारनाथ यात्रेला सहकुटुंब निघालेली शालू तिथून आल्यावर भेटूया असे दीपकला सांगते. त्यानंतर दीपकच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडते आणि त्याचे जीवनच बदलून जाते. मसान म्हणजे स्मशान. स्मशानघाटावर प्रेताची विल्हेवाट लावणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक धक्कादायक घटनेने पुरता हादरून जातो. शालूसोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत नव्या उमेदीने जगण्याकडे पाहू लागलेल्या दीपकचे मनात काहूर माजते. देवी आणि दीपक यांच्या मनातील द्वंद्व, दु:ख, त्यांच्या मनात माजलेले काहूर याचे दर्शन दिग्दर्शकाने संबंध चित्रपटातून घडविले आहे. बनारसचे घाट, गंगा नदीचा प्रवाह, अलाहाबादजवळील संगम, बनारस घाटांवर केले जाणारे धार्मिक विधी इत्यादी गोष्टी दाखवितानाच त्यातला विरोधाभासही दिग्दर्शक प्रभावीपणे मांडतो. दिग्दर्शकाचा पहिलाच सिनेमा असूनही प्रभावी कथनशैलीमुळे सर्व व्यक्तिरेखा भिडतात. आजचा काळ, ग्लोबलायझेशनचे युग, बनारसच्या घाटांवर चालणारे पारंपरिक विधी, धार्मिक चालीरीती याचे दर्शन अविनाश अरुण धावरे यांच्या कॅमेऱ्याने उत्तम घडविले आहे. रिचा चढ्ढाने देवी, संजय मिश्रा यांनी देवीचे वडील, विकी कौशलने दीपक चौधरी अशा प्रमुख व्यक्तिरेखा आपल्या सहजाभिनयाने प्रभावी उभ्या केल्या आहेत. अभिनय, समर्पक संगीत, पाश्र्वसंगीत या सगळ्याची उत्तम सांगड घालणारा हा सिनेमा प्रेक्षकाला भिडणारा सिनेमा आहे.

सुनील नांदगावकर

sunil.nandgaokar@expressindia.com