अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या निकालांवरून जगभरातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि अभ्यासू अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. “पैशाची ताकद आणि घनिष्ठ राजकीय संबंधांवर आधारित भांडवलशाही हरू शकते,” असं मत त्यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे.
ट्रम्प यांच्या धोरणांना अमेरिकन मतदारांची चपराक
अमेरिकेतील या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांना अमेरिकन मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. टेक्सास, साउथ कॅरोलिना, कॅन्सस आणि ओहायो यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये ट्रम्प यांनी सहज विजय मिळवला होता, तिथेच आता मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. या निकालांमुळे सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची चिंता कमालीची वाढली आहे.
युद्धाविरुद्ध अमेरिकन जनतेचा कौल: इराणचा दावा
दरम्यान, या निवडणुकीच्या निकालांवर इराणकडूनही महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे. “अमेरिकन जनतेने महागाई आणि अनावश्यक लष्करी हस्तक्षेपाविरोधात आपले मत नोंदवले आहे,” असा दावा इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी केला. खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणमधील युद्ध आणि लष्करी कारवायांचा फटका रिपब्लिकन पक्षाला बसल्याचे मान्य केले आहे.
अतुल कुलकर्णी नेमकं काय म्हणाले?
अतुल कुलकर्णी यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) मत व्यक्त करताना लिहिले की, “एलॉन मस्कसुद्धा काल निवडणूक हरला. पैशाची ताकद हरू शकते. घनिष्ठ राजकीय संबंधांवर आधारित भांडवलशाही हरू शकते. हंगेरी हे याचे आणखी एक उदाहरण आहे. जगभरातील नेत्यांनी हे आता लक्षात ठेवले पाहिजे.” राजकीय ताकद आणि अफाट श्रीमंतीच्या जोरावर लोकशाहीचा कौल फिरवता येत नाही, असाच संदेश त्यांनी आपल्या या पोस्टमधून दिला आहे.
एकंदरीत, अमेरिकेतील या राजकीय उलथापालथीचे पडसाद आता जगभरात उमटू लागले असून, पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांसाठी हा निकाल मोठा धडा मानला जात आहे.
