मराठी कला क्षेत्रात नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमांतून प्रभावीपणे सतत नावीन्यपूर्ण कथा आणि गीते सादर करणाऱ्या लेखकांचा सन्मान सोहळा मुंबईत नुकताच संपन्न झाला. ‘लेखकांनी केलेला लेखकांचा सन्मान’ हा मूळ हेतू साध्य करत, गेल्या पाच वर्षांतील प्रभावी लेखन करणाऱ्या लेखकांना ‘मानाचि’ या लेखक संघटनेद्वारे  नुकतेच सन्मानित करण्यात आले.  सातत्याने विविधांगी लेखन करणारे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांना याप्रसंगी ‘मानाचि’ संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांच्या हस्ते ‘लेखन कारकीर्द गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चित्रपटातील विशेष योगदानासाठी लेखक आणि दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांना पुरस्कृत करण्यात आले. ‘‘सुमित्रा भावेंनी जवळपास अनेक चित्रपटांच्या संहितालेखनाचे काम केले आहे आणि मी ते उतरवून घ्यायचो तेव्हा मी त्यांचा गणपती होतो,’’ अशी भावना सुनील सुकथनकर यांनी व्यक्त केली. याच विभागात प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा सत्कार करण्यात आला. ‘‘जातपात हा शब्द खूप वेगळय़ा पद्धतीने घेतला जातो, परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्याच जातीतल्या लोकांबरोबर सन्मान मिळाला,’’ अशा शब्दांत आपला आनंद प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला. मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण दर्जेदार लिखाण करणारे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांचा ‘मानाचि’तर्फे ‘विशेष लेखन गौरव सन्मान’ करण्यात आला. ‘‘गेल्या ४७ वर्षांत अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलो, पण लेखक म्हणून माझी ओळख मला सर्वाधिक समाधान देणारी आहे आणि त्याकरिता देण्यात आलेला हा पुरस्कार नक्कीच प्रोत्साहनकारक आहे,’’ असे म्हणत पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ‘मानाचि’ व्यासपीठावरून अधिकाधिक लेखकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत विवेक आपटे यांनी मांडले. मालिकालेखनासाठी शिरीष लाटकर, संतोष अयाचित; नाटय़लेखनासाठी समर खडस, प्राजक्त देशमुख यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींना नाटकात कलाकार म्हणून सहभागी करून एक वेगळा प्रयोग रंगमंचावर करणारे लेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरवं’ या नाटकाकरिता ‘उल्लेखनीय प्रयोगा’साठी सन्मानित करण्यात आले. तसेच चित्रपटगीत लेखनासाठी वैभव जोशी, समीर सामंत, मालिकागीत लेखनासाठी रोहिणी निनावे, मंदार चोळकर, तर नाटय़गीत लेखनासाठी प्राजक्त देशमुख आणि सुजय जाधव यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी मालिकेतील विशेष लेखन योगदानाबद्दल अभिनेते समीर चौघुले यांना सन्मानित करण्यात आले. लेखकांच्या या पहिल्यावहिल्या सन्मान संध्या सोहळय़ात आशीष पाथरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. गायिका अंजली मायदेव यांच्या सुरेल आवाजातील तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने या सोहळय़ाची सुरुवात झाली. गीतकार वैभव जोशी, मंदार चोळकर, समीर सामंत, लेखक राजेश देशपांडे, विजू माने, प्राजक्त देशमुख, अमोल मटकर या समस्त कवींनी सादर केलेल्या कवितांनी आणि अभिनेता समीर चौघुले आणि चेतना भट यांनी सादर केलेल्या विनोदी प्रहसनाने हा सोहळा अधिकच रंगतदार झाला.