रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी-हिंदी चित्रपटांतील एक उत्तम, सशक्त, संवेदनशील अभिनेता म्हणून अतुल कुलकर्णी यांची ओळख आहे. अभिनयाच्या बरोबरीनेच सामाजिक, शैक्षणिक कार्यातील त्यांचा सहभागही अनेकांच्या परिचयाचा आहे. मात्र आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाचा लेखक म्हणून त्यांचे नाव समोर आल्यानंतर निश्चितच त्यांच्या या नव्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना नवल वाटल्याशिवाय राहिले नाही. अतुल मात्र स्वत:ला व्यावसायिक लेखक मानत नाहीत, पण ‘फॉरेस्ट गम्प’ या प्रसिद्ध हॉलीवूडपटाच्या पटकथेचे भारतीयीकरणाच्या निमित्ताने केवळ लेखक म्हणून नव्हे तर माणूस म्हणून समृद्ध अनुभवाची शिदोरी मिळाल्याचे ते सांगतात.

‘फॉरेस्ट गम्प’चे भारतीयीकरण करण्याची कल्पना आणि आमिर खान हे दोन धागे कसे जुळून आले? याबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘‘१४ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. ‘जाने तू या जाने ना’ हा आमिरची निर्मिती असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या प्रीमिअरनंतर आम्ही आमिरच्या घरी गप्पा मारत बसलो असताना तुमच्या आवडीचा चित्रपट कोणता? असा विषय निघाला होता. त्यानंतर काही दिवसांनी एक चित्रीकरण अचानक रद्द झाल्याने घरी बसून होतो, तेव्हा हा चित्रपट पुन्हा पाहण्याची इच्छा झाली. चित्रपट पाहत असताना यातील अनेक गोष्टी, संदर्भ आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून लिहिता येऊ शकतात याची जाणीव झाली आणि बसून लिहायला सुरुवात केली. आपण पटकथा लिहितो आहे आणि आपण लिहू शकतो हे माझ्या तेव्हा लक्षात आलं,’’ असं सांगणाऱ्या अतुल यांनी १० ते १२ दिवसांत पटकथा लिहून काढली आणि त्यानंतर दोन दिवसांत सेकंड ड्राफ्टही पूर्ण केला. अर्थात आमिर यांच्या घरातच चित्रपटाची कल्पना सुचली होती. त्यामुळे आमिरने अडीच वर्षांनी दिलेला होकार आणि मग ‘फॉरेस्ट गम्प’चे हक्क मिळवण्यापासून १४ वर्षांच्या अथक परिश्रमातून साकार झालेला ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 

‘फॉरेस्ट गम्प’ का?

‘फॉरेस्ट गम्प’ हा चित्रपट इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही अभिजात मानला जातो. जगातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी तो एक आहे. कारण एका संपूर्ण काळाची, संपूर्ण देशाची ५० वर्षांची कथा एका माणसाच्या नजरेतून मांडली आहे.  मला कायमच आपल्या आजूबाजूला जे घडतं त्याबद्दल रस वाटत आला आहे. या चित्रपटाच्या विषयाचाही हा जो आवाका आहे, त्यानेच मला आकर्षित केलं, असं ते सांगतात. 

चित्रपट कमल हसन यांच्याकडून शिकलो..

‘‘एकदा चित्रपट या प्रकाराशी तुम्ही जोडला गेला की त्याच्या तांत्रिक अंगाशीही आपण जोडले जातो. मला स्वत:ला पहिल्यापासूनच चित्रपटाच्या तांत्रिक बाबींमध्ये कमालीचा रस होता. कारण माझा पहिला चित्रपट मी कमल हसन यांच्याबरोबर केला. ते कायम हेच म्हणत आले की, मी नटापेक्षा तंत्रज्ञ अधिक आहे. भारतात त्यांनी कधीच डिजिटल तंत्रज्ञान वापरून, ड्रोन वापरून चित्रपट केलेत. आता हे सगळय़ा जगात चर्चेचा विषय ठरला आहे. तंत्राच्या बाबतीत इतका प्रभावी असलेला माणूस जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून लाभतो तेव्हा नक्कीच तो अनुभव वेगळा ठरतो. मी नेहमी म्हणतो, चित्रपट मी खरं त्यांच्याकडून शिकलो,’’ असं अतुल यांनी सांगितलं. कथालेखन, संकलन, मार्केटिंग सगळय़ात रस असल्याने मी कथा लिहू शकलो असं आपल्याला वाटत असल्याचं स्पष्ट करतानाच नटासाठी एक सिनेमा डोळय़ासमोर उभं राहणं हे गरजेचं असतं आणि हा भाग लेखनातही उपयोगी ठरतो, असं ते म्हणतात. 

आमिर खानची पद्धत न्यारी

आमिर खान यांची चित्रपटनिर्मितीची प्रक्रियाच खूप भिन्न आहे, असं अतुल म्हणतात. ‘लाल सिंह चढ्ढा’चा विचार केला तर दिग्दर्शक अद्वैत चंदन तरुण मुलगा आहे. त्याचा हा दुसराच चित्रपट आहे. तो तरुण असल्याने या पिढीची एक वेगळी समज घेऊन आला आहे. देशाच्या ५० वर्षांची गोष्ट.. ज्यापैकी काही त्याने निव्वळ ऐकल्या आहेत. मी आणि आमिर एका पिढीचे आहोत, पण पूर्णपणे भिन्न संस्कृतीत वाढलेलो आहोत. आमचा कॅमेरामन सेतुपतीचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. निर्माती किरण राव- तिचे स्वतंत्र विचार आहेत. इतक्या सगळय़ा व्यक्ती, संस्कृती जेव्हा एका कथेच्या अनुषंगाने विचार करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा तो अनुभव सर्वार्थाने वेगळा ठरतो. आमिर खान हा असा चित्रपटकर्मी आहे जो खूप लोकांना आपली पटकथा वाचून दाखवतो, आपला चित्रपट त्यांना दाखवतो. खूप कमी लोक आपली पटकथा इतरांसाठी खुली करतात, मात्र त्याचा आत्मविश्वास इतका दांडगा आहे की, तो सगळय़ांना त्यावर चर्चेसाठी एकत्र आणतो. त्यामुळे खूप वेगवेगळे विचार, कल्पना तुम्हाला या चर्चेतून मिळतात. अशा पद्धतीने केवळ पटकथेवर एवढी मेहनतीची प्रक्रिया कोणीही करत नाही. एक नट, लेखक म्हणून मला पहिल्यांदाच आमिरची चित्रपट प्रक्रिया जवळून अनुभवता आली आणि माणूस म्हणून मला ‘लाल सिंह चढ्ढा’च्या प्रक्रियेने समृद्ध अनुभव दिले आहेत, असं अतुल यांनी सांगितलं.

  • ‘पटकथा हे अमूर्त स्वरूप’

पटकथा ही चित्रपटाची प्राथमिक पायरी असते. त्याच्या जोरावरच चित्रपट उभा राहतो. कथा नसेल तर चित्रपट मूर्त रूपात साकार होऊच शकत नाही. त्यामुळे पटकथा हे त्याचं अमूर्त रूप असतं, असं अतुल सांगतात. 

  • ‘चर्चा म्हणजे वाद नव्हे’

चित्रपट ही अनेक क्षेत्रांतील कुशल लोक एकत्र येऊन घडणारी, सातत्याने विकसित होत जाणारी कला आहे. एकत्रित विचार, एकत्रित ऊर्जा सेटवर असते. गेली २२ वर्ष अभिनेता म्हणून मी अशा पद्धतीने एकत्र काम करत आलो आहे. इथे दिग्दर्शक हा या चमूचा नेता असतो. त्यामुळे त्याचा निर्णय अंतिम असणार हे एकदा डोक्यात ठेवलं, की मग आपल्याला अडचण येत नाही. एकाच घरात राहून एक भाजी बनवण्यावर आपलं एकमत होणं शक्य नसतं. चित्रपट हा तर इतके लोक एकत्र येऊन घडवत असतात. त्यामुळे एकमेकांचं पटणं – न पटणं, त्यातून चर्चा या गोष्टी होत राहतात. अनेकदा चित्रपट आणि चित्रकर्मीच्या बाबतीत चर्चा म्हणजे वाद किंवा भांडण असा अर्थ माध्यमांकडून रूढ केला जातो. मात्र ते तसं नसतं. चर्चा ही चर्चाच असते, असं ते ठामपणे सांगतात. 

मी काही व्यावसायिक लेखक नाही. मी व्यक्त होऊ शकतो. मात्र एका दमात बसून लिहून काढणं हा माझा पिंडच नाही. अनेकदा आम्ही कलाकार मंडळी जेव्हा काही लिहायचा प्रयत्न करतो ते मग काही काळाने वाईट वाईट व्हायला लागतं. त्यामुळे ठरवून एखाद्या चित्रपटाची कथा लिहिणं वगैरे मला करायचं नव्हतं. अगदी समाजमाध्यमांवरही ठरवून लिहिणं किंवा व्यक्त होणं मला जमत नाही. जेव्हा मला स्वत:ला काही लिहावंसं वाटेल तेव्हा मी आवर्जून लिहीन.

अतुल कुलकर्णी

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author perspective marathi hindi movies actor atul kulkarni acting ysh
First published on: 14-08-2022 at 00:02 IST