कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बिबरच्या मुंबई दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १० मे रोजी जस्टिन बिबर डी. वाय. पाटील स्टेडियमवर गाण्याचा कार्यक्रम करणार आहे. पॉप साँगसाठी प्रसिद्ध असलेला जस्टिन (Justin Bieber) त्याच्या गाण्यांसाठी तर प्रसिद्ध आहेच. पण, काहीवेळा तो असं काहीतरी काम करतो ज्यामुळे त्याला लोकांच्या हृदयातही स्थान मिळतं. जस्टिन बिबरने त्याचे ७५ हजार रुपयांचे गोल्डन तिकीट मुंबईतील एका रिक्षा चालकाच्या मुलाच्या नावावर केल्याचे समोर आलेय.

जस्टिन बिबर ‘पर्पज वर्ल्ड टूर’ (The Purpose World Tour) या संकल्पनेअंतर्गत भारतातील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. १० मे २०१७ ला जस्टिन एका लाइव्ह कॉन्सर्टवेळी परफॉर्म करणार असून त्याचे तिकीट मिळवण्याकरिता दोन महिने अगोदरच लोकांची धावपळ सुरु झाली आहे. त्याच्या या कार्यक्रमाच्या एका गोल्डन तिकीटाची किंमत तब्बल ७५ हजार रुपये आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बिबरने संगीताची खरी जाण असणाऱ्या त्याच्या चाहत्याला ७५ हजारांचे गोल्डन तिकीट भेट स्वरुपात देण्याचे ठरवले आहे. मुंबईतील एका रिक्षावाल्याच्या २२ वर्षीय मुलाला हे तिकीट देण्यात येणार आहे. या मुलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून बिबरला ‘मी तुझा खूप मोठा चाहता आहे,’ असा मेसेज केला होता. यानंतर आयोजक ‘व्हाइट फॉक्स इंडिया’ने त्याला फोन करून तिकीटाबद्दलची माहिती देताच त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. इतकेच नव्हे तर, जस्टिनच्या  या चाहत्याला त्याला भेटण्याची संधीदेखील मिळण्याची शक्यता आहे. कॅनेडियन मेगा पॉप स्टार असलेल्या २३ वर्षीय जस्टिनने कोणासाठी आपुलकी दाखविण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने लुक्मेनिया , मेनिंजाइटिस आणि डाउन सिंड्रोमने पीडित असलेल्या रुग्णांना आर्थिक स्वरुपात मदत केली आहे.

दरम्यान, जगप्रसिद्ध असणाऱ्या ‘वन डायरेक्शन बँण्ड’चा लोकप्रिय गायक झेन मलिकही भारतात येणार असल्याची चर्चा आहे. जस्टिनच्या  ‘पर्पज वर्ल्ड टूर’ या कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्यांच्या यादीत दीपिका पदुकोण, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, झेन मलिक यांच्या नावांचा समावेश आहे.