सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रदर्शित केलेल्या जवळपास प्रत्येक सुपरहिरोपटाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. गेल्या वर्षी ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा माव्‍‌र्हलचा आजवरचा सर्वात मोठा सुपरहिरोपट प्रदर्शित झाला होता. तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केलेल्या या सुपरहिरोपटाचे भारतीयांनी अगदी मनापासून कौतुक केले होते. आता चाहते या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ची आतुरतेने वाट पाहात आहेत. येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या सुपरहिरोपटाची सध्या जगभरात प्रसिद्धी सुरू असून भारतही यात मागे नाही.

‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ हा अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट मालिकेतील शेवटचा भाग असून त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भारतात माव्‍‌र्हल सुपरहिरोपटांचा मोठा चाहता वर्ग आहे. या वर्गाला खूश करण्यासाठी चित्रपटातील कलाकार भारतात येणार आहेत. भारतात केल्या जाणाऱ्या या जाहिरातीची सुरुवात दिग्दर्शक अँथोनी रुसो व जो रुसो मुंबईतून करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ या चित्रपटाला भारतातील इतर शहरांच्या तुलनेने मुंबईकरांनी भरभरून दाद दिली होती. एकटय़ा मुंबईतच या चित्रपटाने ७० कोटी रुपयांची कमाई केली. या पाश्र्वभूमीवर विचार करता मुंबई ही सुपरहिरोंसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. म्हणूनच माव्‍‌र्हल स्टुडिओने मुंबईतूनच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’च्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक रुसो बंधूंबरोबरच आयर्नमॅन ही व्यक्तिरेखा साकारणारा सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियरही मुंबईकरांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. याआधीच्या भागात खलनायक थेनॉसने पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या आणि सर्व सुपरहिरोंना मारल्याचे दाखवण्यात आले होते तर ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’मध्ये यानंतर काय होते? हे दाखवले जाणार आहे.