मंदार गुरव, मुंबई

मार्व्हलचा प्रवास २००२ ते २००७ दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘स्पाडरमॅन’ या चित्रपटमालिकेपासून सुरू झाला. या मालिकेने तुफान यश मिळवले होते. त्यानंतर त्यांनी ‘एक्स मेन’मध्ये गुंतवणूक केली. परंतु दर्जाहीन पटकथा व गोंधळ निर्माण करणारे चित्रपटांचे क्रम यामुळे एक्स मेन हा प्रयोग साफ फसला. परिणामी मार्व्हल कंपनीला कोट्यावधींचे नुकसान सहन करावे लागले. हे नुकसान इतके मोठे होते की त्यांना आपला स्टुडिओ व ‘स्पायडरमॅन’, ‘हल्क’, ‘वुल्वरिन’ यांसारख्या अनेक व्यक्तीरेखा ‘सोनी’ व ‘डिस्ने’ या कंपन्यांकडे गहाण ठेवाव्या लागल्या. शेवटी सर्वकाही गहाण ठेवून त्यांनी डोक्यावरील कर्ज फेडले. मात्र त्यांच्या हातात आता केवळ ५५ कोटी रूपये उरले होते. हे पैसे घेऊन घरी बसावे असा सल्ला अनेक बड्या उद्योजकांनी मार्व्हलला दिला. परंतु मार्व्हलचे प्रणेते ‘स्टॅन ली’ ही अपमान जनक परिस्थिती स्विकारायला तयार नव्हते. त्यांनी वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा एकदा मार्व्हलला गतवैभव मिळवून देण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांनी आपली चित्रकला वही काढली आणि तब्बल ४६ वर्षानंतर पहिले चित्र रेखाटले ते टोनी स्टार्क उर्फ ‘आयर्नमॅन’चे..

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta entertainment Murder Mubarak movie released on Netflix channel
अजब व्यक्तिरेखांची गजब जंत्री

२००८ साली हाताशी उरलेल्या केवळ ५५ कोटी रूपयांमध्ये मार्व्हलने ‘आयर्नमॅन’ तयार केला. स्टॅन लीची कल्पना व रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचा करिश्मा यामुळे या चित्रपटाने जबरदस्त यश संपादीत केले. केवळ ५५ कोटी रूपयांमध्ये तयार झालेल्या या सुपरहिरोपटाने ५६५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर आयर्नमॅन चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची कल्पना मांडण्यात आली. आणि पाहता पाहता आयर्नमॅन – २ पासून सुरू झालेला प्रवास तब्बल २१ यशस्वी सुपरहिरोपटानंतर आज ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ पर्यंत पोहोचला आहे. हा चित्रपट म्हणजे एका वेड्या चित्रकाराने वयाच्या ८५ व्या वर्षी पहिलेल्या स्वप्नांचा शेवटचा अध्याय होय.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर’चा दुसरा भाग आहे. चित्रपटाची सुरवात आयर्नमॅन पासून होते. इन्फिनीटी वॉरमध्ये थेनॉस विरुद्ध झालेल्या भिषण युद्धात हरलेला आयर्नमॅन कॅप्टन मार्व्हलच्या मदतीने अखेर पृथ्वीवर परततो. आयर्नमॅन परतल्यानंतर पुर्नउत्साहीत झालेले कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक विडो, रॉकेट, नेब्यूला हे सात सुपरहिरो पुन्हा एकदा थेनॉसवर हल्ला करतात. मात्र, आपले कार्य संपवून निवृत्त झालेल्या थेनॉसने इन्फिनीटी स्टोन नष्ट केल्यामुळे हा हल्ला बेकार होतो. दरम्यान सुपरहिरो थॉर स्ट्रॉम ब्रेकरच्या मदतीने थेनॉसला मारून टाकतो, परंतू पुन्हा एकदा थेनॉसची सरशी होते.

इथूनच खऱ्या अर्थाने चित्रपटाला सुरवात होते. कारण थेनॉसने संपूर्ण आकाशगंगेतील नाहीशी केलेली अर्धी सजीवसृष्टी पुर्नजीवीत करायची कशी? हे सर्वात मोठे आव्हान अ‍ॅव्हेंजर्स समोर असते. या प्रश्नाचे उत्तर जवळपास पाच वर्ष अ‍ॅव्हेंजर्स शोधत असतात. दरम्यान गेली अनेक वर्षे क्वांटम रेलममध्ये फसलेला ‘अँट मॅन’ अचानक बाहेर येतो. पुढे त्याच्याच मदतीने अ‍ॅव्हेंजर्स भूतकाळात जाऊन सर्व इन्फिनीटी स्टोन परत मिळवण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात अनेक गमती जमती घडतात. चित्रपटाच्या शेवटी मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्समध्ये आपण आजवर पाहिलेले सर्व सुपरहिरो एकत्रीतरित्या थेनॉसविरुद्ध युद्ध करतात. या युद्धात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडतात. ज्या घटनांची आपण कधी स्वप्नातही कल्पना केलेली नाही. परंतु प्रत्येक युद्धाची किंमत ही मोजावीच लागते या नियमाप्रमाणे अ‍ॅव्हेंजर्स फौजेलाही थेनॉस विरुद्ध पुकारलेल्या युद्धाची किंमत चुकवावी लागते. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटाचा शेवट चाहत्याचे हृदय हेलावून टाकणारा आहे.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचे दिग्दर्शन ‘अँथोनी रूसो’ व ‘जो रूसो’ या दोन भावांनी केले आहे. त्यांनी या चित्रपटाचे कथानक ‘द इन्फिनीटी गॉन्लेट’ व ‘अ‍ॅव्हेंजर्स:इन्फिनीटी वॉर’ या कॉमिक्स आणि कार्टून मालिकेवरून तयार केले होते. त्यामुळे थोडाफार फरक जर सोडला तर चित्रपटातील प्रत्येक फ्रेममध्ये कॉमिक्सचा प्रभाव दिसून येतो. हा चित्रपट मार्व्हलने तयार केलेला आजवरचा सर्वात लांबलचक चित्रपट आहे. तब्बल ३ तास १३ मिनिटांच्या या चित्रपटात दोन इंटरव्हल येतात. हा चित्रपट आयमॅक्स व थ्रीडी हा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. हा संपूर्ण चित्रपट एखाद्या क्रिकेट मॅचप्रमाणे वाटतो. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये पहिली काही षटके पावर प्लेची असतात. त्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली जाते मग हळूहळू सामना जसा पुढे सरकतो फलंदाजांचा वेगही कमी होतो. मात्र, अंतीम षटकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी पहायला मिळते. हा चित्रपटही असाच काहीसा आहे. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासात जबरदस्त हाणामारी पाहायला मिळते. परंतू त्यानंतर चित्रपटाचा वेग कमी होतो. चित्रपटाला बांधण्यासाठी अनेक लहान लहान फ्लॅशबॅक पेरले आहेत. हे सीन्स इतक्या पद्धशीरपणे पेरले आहेत की त्यामुळे अंतिम युद्धासाठी लागणारी भावनीक पार्श्वभूमी तयार होते. शेवटच्या अर्ध्यातासात इतकी हाणामारी आहे की आकाश पाळण्यात बसल्याचा अनुभव येतो.

हा चित्रपट मुळातच अ‍ॅक्शनपट आहे शिवाय याआधी प्रदर्शित झालेल्या २१ चित्रपटांच्या माध्यमातून याची पार्श्वभूमी तयार केली गेली आहे. त्यामुळे कलाकारांच्या अभिनयाकडे फारसे लक्ष जात नाही. परंतू उत्तम मॉडेल्सनिर्मिती, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, लायटिंग, मुद्राभिनय, मोशन ग्राफिक्स,व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन आणि सिनेमेटोग्राफी या तांत्रिक बाजूंमुळे चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो. तसेच एखादी लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारताना जितके दडपण कलाकारावर असते त्याहून कैकपटीने दिग्दर्शकावर असते. या चित्रपटात एकूण ३२ लोकप्रीय व्यक्तिरेखा आहेत. मात्र, हा संपूर्ण चित्रपट पाहता हे आव्हान दिग्दर्शकांनी यशस्वीपणे पेलले आहे असे म्हणता येईल.