‘माव्‍‌र्हल’चा आजवरचा सर्वात मोठा चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. गेली दहा वर्षे या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू होते. किंबहूना, ‘माव्‍‌र्हल’ने गेल्या दहा वर्षांत तयार केलेल्या प्रत्येक चित्रपटाचा वापर ‘इन्फिनिटी वॉर’ची पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी केला गेला आहे. आणि आता इतक्या वर्षांच्या तपस्येनंतर तयार झालेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असल्याने चाहत्यांची उत्सुकता आता  शिगेला पोहोचली आहे. एवढय़ा मेहनतीने तयार  झालेल्या या चित्रपटातील ‘इन्फिनिटी वॉर’ म्हणजे नेमके आहे तरी काय? आणि याची पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी २००८ ते २०१८ दरम्यान तब्बल १५ चित्रपटांचा खर्च का करावा लागला?..

‘इन्फिनिटी वॉर’मधील ‘इन्फिनिटी’ या शब्दाचा अर्थ ‘इन्फनाईट’ असा आहे. म्हणजेच अमर्याद शक्ती होय. असीमित शक्ती धारण करणाऱ्याच्या विरोधात आपल्या सुपरहिरोंनी केलेले युद्ध म्हणजेच ‘इन्फिनिटी वॉर’ होय. आजवर कलिंगच्या युद्धापासून पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध यांसारख्या युद्धांचा रक्तरंजित इतिहास पाहिला तर लक्षात येते की, पृथ्वीवर झालेल्या जवळजवळ प्रत्येक युद्धाच्या केंद्रस्थानी सत्ता व संपत्ती आहे. काहींनी सत्ता मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आणि काहींनी त्यास केलेला विरोध यांतूनच युद्धाची निर्मिती होत असते. ‘इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाची पटकथादेखील याच संकल्पनेवर आधारित आहे. परंतु हे युद्ध केवळ पृथ्वीच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून या वेळी संपूर्ण आकाशगंगा वाचवण्याची जबाबदारी आपल्या सुपरहिरोंवर आहे. परंतु ही अमर्याद शक्ती नेमकी आहे तरी काय? आणि त्याच्याविरुद्ध आपल्या सुपरहिरोंचा निभाव लागणार तरी कसा? असा काहीसा खेळ निर्माते-दिग्दर्शक यांनी या चित्रपटात रंगवला आहे.

या चित्रपटात ज्या अमर्याद शक्तीचा वारंवार उल्लेख होत आहे, ती शक्ती म्हणजे ‘इन्फिनिटी स्टोन’ होय. ‘इन्फिनिटी स्टोन’ या संकल्पनेभोवतीच संपूर्ण चित्रपट फिरत असल्यामुळे त्याला ‘इन्फिनिटी वॉर’असे म्हटले गेले आहे. अमर्याद शक्ती असलेले हे खडे मिळवण्यासाठी ‘माव्‍‌र्हल’चा आजवरचा सर्वात मोठा खलनायक ‘थेनॉस’ हा अत्याधुनिक तंत्रज्ञान व जादूचा वापर करून अनेक आकाशगंगांचा प्रवास करत पृथ्वीवर येतो. आणि या शक्तीचा अधिपती होण्यासाठी आतुर झालेल्या थेनॉसला रोखण्याचा विडा आपले सुपरहिरो उचलतात. परंतु हे ‘इन्फिनिटी स्टोन’ म्हणजे नेमके आहेत तरी काय? अशी कोणती शक्ती त्यात आहे? ‘थेनॉस’च्या हातात जर ते आले तर असे काय होईल? जे रोखण्यासाठी तब्बल ७५ सुपरहिरोंना एकत्र लढा द्यावा लागतो आहे. सुपरहिरो सिक्वेल्सचा हा पसारा निर्माण करताना एकेक गोष्ट एकत्र आणल्यानंतर आता या सगळ्यांचा एकत्र खेळ यात रंगवण्यात आला असल्यानेच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

अँथनी आणि जो रुसो या दिग्दर्शक बंधूंनी या चित्रपटात ‘इन्फिनिटी स्टोन’ या संकल्पनेचा वापर केला आहे, यालाच ‘इन्फिनिटी जेम्स’ किंवा ‘शक्ती पुंज’ असेही म्हटले जाते. एकूण सोल, टाइम, माइंड, रिअ‍ॅलिटी, पावर, स्पेस असे सहा शक्ती-खडे आहेत. यातील प्रत्येक खडा विश्वातील एका घटकाचे प्रतिनिधित्व करतो. ‘माव्‍‌र्हल’ने या चित्रपटासाठी आखलेल्या कथाकल्पनेनुसार विश्वाची निर्मिती होण्याआधी या सहा शक्ती अस्तित्वात होत्या आणि त्यांच्या विघटनातूनच विश्वाची निर्मिती झाली आहे. परंतु या शक्ती इतक्या प्रभावी होत्या की विघटन झाल्यानंतरही त्यांचे काही अंश विश्वातील विविध भागांत आजही अस्तित्वात आहेत. आणि ते जर एकत्र केले तर त्यांचा वापर करणारी व्यक्ती समस्त विश्वावर अधिराज्य गाजवू शकते. माव्‍‌र्हलने २००८ साली तयार केलेल्या ‘आयर्नमॅन’ या चित्रपटापासून आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटात या ‘इन्फिनिटी स्टोन’ची माहिती दिली आहे. त्यातील ‘स्पेसस्टोन’चा उल्लेख २०१२ साली आलेल्या ‘द अ‍ॅव्हेंजर्स’मध्ये होता. त्याचा उल्लेख चित्रपटात ‘टेसरेक्ट क्यूब’असा करण्यात आला होता. या संकल्पनेसाठी चक्क स्टीफन हॉकिंग यांच्या ‘वॉमहोल थिअरी’चा वापर केला गेला आहे. ‘माइंडस्टोन’ या खडय़ाचा उल्लेख ‘अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’मध्ये आला आहे. या चित्रपटात हा खडा आधी लॉकी या खलनायकाच्या छडीत दिसतो. तो खडा व्हिजनच्या डोक्यावर लावला जातो. रिअ‍ॅलिटी स्टोन या तिसऱ्या खडय़ाचा उल्लेख २०१३ मध्ये आलेला ‘थॉर : द डार्क वर्ल्ड’ या चित्रपटात केला गेला होता. ‘टाइम स्टोन’ हा चौथा खडा २०१६ मध्ये ‘डॉक्टर स्ट्रेंज’ चित्रपटाचा आधार होता. सोल स्टोन आणि पॉवर स्टोन या दोन खडय़ांचीही ओळख अनुक्रमे ‘थॉर राग्नारोक’ आणि ‘गार्डियन ऑफ द गॅलेक्सी २’ या चित्रपटातून झालेली आहे.

ही सगळी माहिती इथे देण्याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत आलेला प्रत्येक सुपरहिरो मग ते पहिल्या फळीतील आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, हल्क, डॉक्टर स्टेंज, थॉर ही सुपरहिरो मंडळी असतील किंवा दुसऱ्या फळीत आलेली स्पायडरमॅन, अँटमॅन, ब्लॅक पँथर, व्हिजन अशी नवी मंडळी या सगळ्यांना एकत्र करायचे. त्यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचे आलेले संदर्भ जोडायचे, त्याला या ‘इन्फिनिटी स्टोन’ची जोड द्यायची, हा कथेचा गुंता एकीकडे सांभाळत दुसरीकडे प्रत्येक कलाकाराला एकत्र आणून बांधलेली ही मोट पडद्यावर भव्यदिव्य कशी दिसेल? यासाठी दिग्दर्शकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यासाठी पुन्हा ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाची निर्मिती दोन भागांमध्ये केली गेली आहे. यातील पहिल्या भागात ‘इन्फिनिटी स्टोन’चा एकत्रित पुन्हा एकदा परिचय करून दिला जाणार आहे. शिवाय ते मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या थेनॉसच्या शक्तींची माहिती आपल्याला मिळेल. या पहिल्या भागाच्या यशावर दुसऱ्या भागाचे भवितव्य अवलंबून आहे. त्या सिक्वलचीही घोषणा करण्यात आली असून तो पुढच्या वर्षीच्या मेमध्ये चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे. एक ना अनेक कारणांमुळे हा चित्रपट हॉलीवूडसाठी आणि अर्थातच माव्‍‌र्हल स्टुडिओसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सगळ्यात जास्त बजेट असलेला, कलाकारांची एकच जंत्री असलेला असा हा सुपरहिरो पट पडद्यावर नेमका काय इतिहास निर्माण करतो याकडे सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या आहेत.

बॉलीवूडची मदारही या चित्रपटावर..

एप्रिल-मे महिना हा सुट्टीचा काळ असल्याने खरे म्हणजे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्याचे आणि कमाईचे हे दोन महिने असतात. मात्र एप्रिलमध्ये बिग बजेट चित्रपटांची नांदीच झालेली नसल्याने बॉक्स ऑफिसवर हिट आणि कमाई दोन्हींची मारामारी आहे. एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेले हिंदूी चित्रपट वेगळ्या धाटणीचे होते खरे.. मात्र त्यांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीलाच इरफान खानची मुख्य भूमिका असलेला अभिनय देव दिग्दर्शित ‘ब्लॅकमेल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, दुसऱ्या आठवडय़ात शूजित सिरकार दिग्दर्शित वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला ‘ऑक्टोबर’ प्रदर्शित झाला. तिसऱ्या आठवडय़ात तर माजिद मजिदींचा पहिला हिंदी चित्रपट ‘बियाँड द क्लाऊड्स’, राजकुमार रावचा ‘ओमेर्ता’, अभय देओलचा ‘नानू की जानू’ असे वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र यापैकी कुठल्याच चित्रपटाने फारशी समाधानकारक कमाई केलेली नाही. त्यातल्या त्यात मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ने दीडशे कोटींच्या पुढे मजल मारत अजूनही चित्रपटगृहातील आपले स्थान अबाधित ठेवले आहे. त्यामुळे आता कमाईची सगळी आशा ही शेवटच्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’वर केंद्रित झालेली आहे. माव्‍‌र्हलपटांना भारतीय बॉक्स ऑफिसवर मिळालेले आजवरचे यश पाहता याही चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांसाठी प्रेक्षक नक्कीच  मिळेल. त्यानंतर तो टिकेल की नाही हे मात्र या चित्रपटावर अलवंबून असणार आहे.