दिल्लीतील जंतर-मंतरवर मागील काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. पण यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता देशभरातून विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून विविध शहरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतही विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मात्र, यावेळी ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री आयेशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
अभिनेत्री आयेशा खान ही आज (२२ जुलै) मुंबईतील दादर या ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. मात्र, यावेळी मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. या कारवाईबाबत आयेशा खानने इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आयेशा खानला मुंबई पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत.
आयेशा खानने काय म्हटलं?
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आयेशा खानने म्हटलं की, “नीट विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं होतं. त्यामुळे आम्ही गेलो होतो. मात्र, आम्ही काहीही बोललो नाही किंवा कोणतीही कृती केली नाही, आम्ही फक्त रस्त्यावर उभे होतो. तरी देखील मला आणि माझ्या काही मैत्रिणींना पोलिसांनी कोणतीही कल्पना न देता जबरदस्तीनं व्हॅनमध्ये टाकलं. तसेच माझ्या भावाला पोलिसांनी फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि आम्हाला वरळी पोलीस ठाण्यात आणलं”, असं अभिनेत्री आयेशा खानने म्हटलं आहे.
‘रस्त्यावर उभं राहणं हा गुन्हा कधीपासून झाला?’
“आम्ही पोलिसांना सतत विचारत होतो की आम्ही काय केलं? पण कोणीही आम्हाला काहीही उत्तर दिलं नाही. आम्हाला दादरपासून दूर असलेल्या वरळी पोलीस ठाण्यात आणलं आहे. रस्त्यावर उभं राहणं हा गुन्हा कधीपासून झाला? अजूनही पोलीस ठाण्यात मी तोच प्रश्न विचारत आहे. मला का ताब्यात घेतलं आहे? मी कोणता कायदा मोडला? लोकशाही हक्क आणि त्याचे रक्षण करणं तर दूरच, उलट तुम्ही तुमच्याच नागरिकांना त्रास देत आहात, कशासाठी?”, असंही अभिनेत्री आयेशा खानने म्हटलं आहे.
