भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ अयोध्येत चौक बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या प्रशासनाला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात पुढील १५ दिवसांत अयोध्येतील एका मोठ्या चौकाची ओळख करून दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावेत. हे निर्देश येताच अयोध्या महानगरपालिकेने शहरातील प्रमुख ठिकाणांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रामजन्मभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील अयोध्येतील मुख्य चौकांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जातं आहे. अयोध्येचे महापौर हृषिकेश उपाध्याय म्हणाले की, येत्या १० दिवसांत एक जागा निश्चित करण्यात येईल. आणखी वाचा : चित्रपटात मेकअप न करण्याऱ्या ‘या’ अभिनेत्रीने धुडकावले चक्क २ कोटींचे मानधन लता मंगेशकर यांचे या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. देशातील सर्वात प्रसिद्ध गायिका, लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. २००१ मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित केले. तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या लता दीदींच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून मुंबईत पोहोचल्यानंतर लतादीदींच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. आणखी वाचा : मेहूणीचा हात पकडून नवरदेवाने केले असे काही ‘ते’ दृश्य कॅमेऱ्यात झाले कैद लता मंगेशकर यांना २८ दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, लतादीदींना करोना आणि न्यूमोनिया झाला आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवावे लागले. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१२ वाजता लता मंगेशकर यांचे निधन झाले. डॉक्टरांनी सांगितले की, न्यूमोनिया आणि करोनामुळे त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते.